मुंबई - नवी मुंबई मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून सध्या वाद सुरू आहे. या विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी होत आहे. तर,राज्य शासनाकडून या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांच नाव दिले जाईल हे घोषित करण्यात आले आहे. मात्र, आता बंजारा समाजाकडून या विमानतळाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची नवी मागणी केली जात आहे.
विधानभवन परिसरात आंदोलन
नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीकडून करण्यात येत आहे. राज्य सरकारने विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास सिडकोमध्ये ठराव पास केला आहे. यासंबंधी वाद सुरू असताना आता बंजारा समाजाकडून नवी मुंबई विमानतळाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. यासंबंधी विधान भवन परिसरातील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनानंतर पोलिसांनी वसंत विचारधारा मंचाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
नवी मुंबई विमानतळाला आधुनिक महाराष्ट्राचे वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी बंजारा समाजाकडून करण्यात आली आहे. ही मागणी करत आज विधानभवन येथील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापुढे बंजारा समाजाकडून आंदोलन करण्यात आली. वसंत विचारधारा मंचाकडून ही मागणी करण्यात आली आहे. शिल्पकार','कृषी औदयोगीक क्रांतीचे जनक' व 'नवी मुंबईचे निर्माते तथा सिडकोचे शिल्पकार वसंतरावजी नाईक यांचे कर्तृत्व राज्यासह देशालाही गौरवान्वित करणारे आहे. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करीत असताना त्यांनी मोठ्या दूरदृष्टीने नवी मुंबईची पायाभरणी व उभारणी केली. तत्कालिन विरोधी पक्षानी नव्या मुंबईच्या निर्मितीला प्रचंड विरोध दर्शवीला होता. परंतु दूरदृष्टी असणारे 'विकासाचे महानायक' वसंतरावजी नाईक यांनी नवीं मुंबई उभारली ही भूमिका मांडत विमानतळाला वसंतराव नाईक नाव देण्यावर ठाम राहण्याची भूमिका वसंत विचारधारा मंचाने मांडली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी
नवी मुंबई मध्ये होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दी बा पाटील यांचे नाव देण्यात यावे, किंवा बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे या बाबत मतमतांतरे असताना भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपली भूमिका पुढे करत, नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव योग्य असल्याचं मत मांडलं होतं. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला कोणाचाही विरोध असणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले होते.
हेही वाचा - अदर पूनावाला पुण्यात परतले, मोठ्या नेत्यांकडून धमक्या मिळत असल्याने सोडला होता देश