मुंबई - राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे 21 रुग्ण आढळून आले आहेत. सध्या या विषाणूचे संक्रमण कमी असले तरी त्याची घातकता ही जास्त आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून नमुने गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण आतापर्यंत 21 रुग्णांना झाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. डेल्टा प्लस विषाणूचे संक्रमण हे झपाट्याने होत नाही. मात्र या विषाणूची घातकता रुग्णांवर अधिक प्रमाणात दिसून आल्याचेही यावेळी आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. डेल्टा प्लसच्या विषाणूची लागण ही लस घेतलेल्या लोकांनाही होते का? याबाबत अधिक माहिती गोळा करण्यासाठी जास्त प्रमाणात नमुने घेतले जात असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांकडून देण्यात आली आहे. राज्यात या घातक विषाणूची लागण झालेले रुग्ण केवळ 21 आहे त्यापैकी 9 रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील 7, मुंबई 2 आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहेत. मात्र डेल्टा प्लस विषाणूची घातकता पाहता राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये याबाबतचे नमुने गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
प्रत्येक जिल्ह्यातून घेणार शंभर नमुने
डेल्टा प्लसच्या विषाणूचे संक्रमणाबाबत राज्य सरकार गंभीर असून, याबाबत प्रत्येक जिल्ह्यातून शंभर नमुने घेतले जाणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार आहे. यासोबतच या विषाणूची लागण असलेल्या रुग्णांनी प्रवास केला होता का? या प्रवासादरम्यान त्या रुग्णाच्या संपर्कात कोण-कोणत्या व्यक्ती आल्या होत्या? रुग्णाचे लसीकरण झाले होते का? त्यांना कोरोनाची पुन्हा लागण झाली का? या सगळ्याची तपासणी केली जाणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आतापर्यंत 15 मेपासून 7500 नमुने तपासण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
विशेष संस्था करणार नमुने गोळा
प्रत्येक जिल्ह्यातून शंभर नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सीएसआयआर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. या संस्थेच्या मार्फत नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
हेही वाचा - महाराष्ट्राने तेलंगणाचे २ हजार कोटी वाचवले, वारंगलमध्ये धावणार महा- मेट्रोने विकसित केलेली मेट्रो-निओ