मुंबई - गेल्या दीड ते दोन वर्षापासून राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालेला आहे. कोरोनाची दुसरी लाटही येऊन गेली. ती मृत्यूच्या पातळीवर जास्त घातक ठरली. आता ही दुसरी लाट मोठ्या प्रमाणात ओसरली आहे. राज्यात काही ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांमध्ये शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये काल १ ऑगस्ट रोजी राज्यातील तब्बल ३३ पालिका व जिल्हांमध्ये एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, शून्य रुग्णांची नोंद होणाऱ्या विभागांची संख्या वाढत असल्याने, मृत्युदर कमी होण्यास मोठी मदत होईल, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
शून्य मृत्यूच्या विभागांची संख्या वाढतेय -
कोरोना विषाणूचा गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून प्रसार सुरु झाला आहे. हा प्रसार सुरु झाल्यापासून राज्यातील पालिका, महापालिका व जिल्हा प्रशासन अशा ६१ विभागांकडून कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची, बरे झालेल्या रुग्णांची तसेच, मृत्यूंची संख्या राज्याच्या आरोग्य विभागाकडे एकत्रित केली जाते. यामधून राज्यातील एकूण कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या, एकूण मृत्यू तसेच, बरे झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीत रोज अहवाल प्रसिद्ध केला जातो.
शून्य मृत्यूंची नोंद होणाऱ्या विभागांच्या संख्येत वाढ
राज्य सरकारकडून कोरोना विषाणूबाबत जाहीर करण्यात येणाऱ्या अहवालानुसार (२७ जुलै रोजी २६), (२८ जुलै रोजी २९), (२९ जुलैला २६), (३० जुलैला ३०), (३१ जुलैला ३२) तर, (१ ऑगस्ट रोजी ३३) पालिका, महापालिका आणि जिल्ह्यात शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. शून्य मृत्यूंची नोंद होणाऱ्या विभागांच्या संख्येत वाढ होत असल्याने आणि मृत्यूंची संख्या कमी होत असल्याने, मृत्युदर कमी होईल अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
१ लाख ३२ हजार ९४८ मृत्यूची नोंद -
काल १ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार एकूण ६० लाख ९४ हजार ८९६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन, घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५९ टक्के एवढे झाले आहे. काल आज राज्यात ६ हजार ४७९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, १५७ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कालपर्यंत एकूण १ लाख ३२ हजार ९४८ मृत्यूची नोंद झाली आहे. कालपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ८१ लाख ८५ हजार ३५० प्रयोगशाळेतील नमुन्यांपैकी ६३ लाख १० हजार १९४ (१३.१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ६७ हजार ९८६ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत.
राज्यात ७८ हजार ९६२ अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात ७८ हजार ९६२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मृत्यूदर २.१ टक्के - (१९ जुलैला ६६), (२० जुलैला १४७), (२१ जुलैला १६५), (२२ जुलैला १२०), (२३ जुलैला १६७), (२४ जुलैला २२४), (२५ जुलैला १२३), (२६ जुलैला ५३), (२७ जुलैला २५४), (२८ जुलैला २८६), (२९ जुलैला १९०), (३० जुलैला २३१), (३१ जुलैला २२५), (१ ऑगस्टला १५७) अशी मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. राज्यात १ ऑगस्टपर्यंत एकूण १ लाख ३२ हजार ९४८ मृत्यूची नोंद झाली आहे.
येथे शून्य मृत्यूंची नोंद -
ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी निजामपूर महापालिका, मीरा भाईंदर महापालिका, पालघर रायगड पनवेल महापालिका, मालेगाव महापालिका, धुळे महापालिका, नंदुरबार जालना हिंगोली परभणी महापालिका, लातूर महापालिका, नांदेड महापालिका, अकोला महापालिका, अमरावती महापालिका, यवतमाळ वाशिम नागपूर महापालिका, वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर महापालिका आणि गडचिरोली या महापालिकांचा समावेश आहे.