मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चा अध्यक्षांनी (BJP Yuva Morcha) शिवडी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा (Defamation Case) दाखल केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर अवमानकारक वक्तव्यामुळे शिवडी न्यायालयात दावा करण्यात आला होता. त्या याचिकेवर आज न्यायालयात दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. या याचिकेवर 11 फेब्रुवारी रोजी शिवडी न्यायालय निकाल देणार आहे.
11 फेब्रुवारी रोजी निकाल -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गेल्या काही दिवसांपासून वक्तव्य करत आहेत. त्यामुळे भाजपकडून 25 जानेवारीला शिवडी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला होता. या याचिकेवर शिवडी न्यायालयात आज सुनावणी झाली. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी शिवडी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात नाना पटोले यांच्या विरोधात अब्रुनुकसानीची याचिका दाखल केली असून, कलम 153 बी, 500, 504, 505(2), 506 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
काय आहे याचिका -
पंतप्रधान हे देशातील घटनात्मक पद आहे आणि या पदाचा अपमान करणं हा संपूर्ण देशाचा आणि भारतातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आपला निषेध व्यक्त केला आहे.
मुंबईत भाजपतर्फे 18 जानेवारी रोजी मरिन ड्राईव्ह पोलीस स्थानकाबाहेर आंदोलन केले आणि याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावर मुंबई पोलिसांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं होतं की याप्रकरणी चौकशी करून कारवाई करू, मात्र अद्याप राज्यात कुठेही गुन्हा नोंदवला नाही. त्यामुळे अखेर भाजप युवा मोर्चातर्फे न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
भंडाऱ्यात मोदींबद्दल एक वक्तव्य करुन वाद ओढवून घेतलेल्या नाना पटोलेंनी मोदी नाव वापरत आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नाना पटोलेंकडून मोदींबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरुच आहे. असेच एक वक्तव्य केल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुन्हा वादात सापडले आहेत.