मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रो, कावीळ, डेंग्यू, हिवताप स्वाईन फ्ल्यू यासारखे आजार समोर येतात. २०१२ ते २०२१ या १० वर्षाच्या कालावधीत मलेरियाच्या रुग्णांमध्ये ४४.२६ टक्क्यांनी घट ( Malaria patients mumbai ) झाली आहे. तर डेंग्यूच्या रुग्णांमध्ये ( Dengue patients Mumbai ) ७४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या १० वर्षात मलेरियामुळे ११६३ रुग्णांचा तर डेंग्यूमुळे १३५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मलेरिया आणि डेंग्यू या दोन आजारांमुळे गेल्या १० वर्षात २५१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मलेरियाच्या रुग्णांमध्ये ४४.२६ टक्के घट : प्रजा फाऊंडेशन या एनजीओने पालिकेकडून आरटीआय माध्यमातून मिळवलेल्या आकडेवारीवरून नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये २०१२ ते २०२१ या १० वर्षांच्या कालावधीत मलेरियाचे १ लाख ३४ हजार ५२२ रुग्ण आढळून आले आहेत. २०१२ मध्ये मलेरियाचे २२,४९९ रुग्ण आढळून आले होते. २०२१ मध्ये त्यात घट होऊन ९,९५९ रुग्ण आढळून आले आहेत. मलेरिया रुग्णांच्या नोंदीमध्ये गेल्या १० वर्षात ४४.२६ टक्के घट झाली आहे. गेल्या १० वर्षात १ लाख ३४ हजार ५२२ रुग्णांपैकी ११६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ० ते ४ वयोगटातील १८७, ५ ते १९ वयोगटातील ७९, २० ते ३९ वयोगटातील २७६, ४० ते ५९ वयोगटातील ३१४ तर ६० वर्षावरील ३१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
डेंग्यूच्या रुग्णांमध्ये ७४ टक्के वाढ : मुंबईमध्ये २०१२ ते २०२१ या १० वर्षांच्या कालावधीत डेंग्यूचे १ लाख २० हजार ८८४ रुग्ण आढळून आले आहेत. २०१२ मध्ये डेंग्यूचे ४,४२१ रुग्ण आढळून आले होते. २०२१ मध्ये त्यात वाढ होऊन ७,६८३ रुग्ण आढळून आले आहेत. मलेरिया रुग्णांच्या नोंदीमध्ये गेल्या १० वर्षात ७४ टक्के वाढ झाली आहे. गेल्या १० वर्षात १ लाख २० हजार ८८४ रुग्णांपैकी १३५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ० ते ४ वयोगटातील २२७, ५ ते १९ वयोगटातील २२२, २० ते ३९ वयोगटातील ३७३, ४० ते ५९ वयोगटातील २५४ तर ६० वर्षावरील २७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पालिकेचा ऍक्शन प्लॅन : मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रो, कावीळ, डेंग्यू, हिवताप स्वाईन फ्ल्यू यासारखे आजार समोर येतात. मागील वर्षापर्यंत या आजारांमुळे मृत्यूही झाले होते. यावर्षी आतापर्यंत पावसाळी आजारांमुळे एकही मृत्यू झालेला नाही. यासाठी आजार आणि मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. साथीचे आजार वाढल्यास वेळीच उपचार मिळावे यासाठी पालिकेच्या विविध रुग्णालयात दीड हजार बेड्स ऍक्टिव्ह करण्यात आले आहेत. गरज पडल्यास बेड्सची संख्या वाढवण्यात येणार आहे. मलेरिया रुग्णांचा शोध घेण्यासाठी रक्त तपासणी भर दिला जात असून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मलेरिया, गॅस्ट्रो, कावीळ, डेंग्यू या आजाराचे रुग्णांवर वेळीच उपचार करण्यासाठी औषधसाठा पुरेसा उपलब्ध करण्यात आला आहे. दूषित पाण्यामुळे कावीळ होण्याचा धोका असून यासाठी संपूर्ण मुंबईतून रोज पाण्याचे २०० नमुने संकलित करण्यात येत असून कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
पालिकेकडून जनजागृती : पावसाळी आजार रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी यासाठी पालिकेच्या २४ वॉर्डात बॅनर्स, होडिंग, पोस्टर्सच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. तसेच आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली आहे. पाणी उकळून व गाळून प्यावे, आपल्या परिसरात पाणी जमा होऊ देऊ नये, परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन गोमारे यांनी मुंबईकरांना केले आहे.
हेही वाचा - Booster Dose: करोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा मोफत देण्याचा केंद्राचा निर्णय