मुंबई - चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगावला अभयारण्य घोषित करण्यासह, राज्यातील 10 नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय वन्यजीव मंडळाच्या 16 व्या बैठकीत घेण्यात आला आहे.
नवीन 10 संवर्धन राखीव क्षेत्र
राज्यात घोषित करण्यात आलेली नवीन 10 संवर्धन राखीव क्षेत्र पुढीप्रमाणे आहेत. आंबोली दोडामार्ग संवर्धन राखीव क्षेत्र, सिंधुदुर्ग,चंदगड संवर्धन राखीव क्षेत्र, कोल्हापूर,आजरा- भुदरगड संवर्धन राखीव क्षेत्र, कोल्हापूर,गगनबावडा संवर्धन राखीव क्षेत्र, कोल्हापूर,पन्हाळगड संवर्धन राखीव क्षेत्र, कोल्हापूर,विशाळगड संवर्धन राखीव क्षेत्र, कोल्हापूर,जोर जांभळी संवर्धन राखीव क्षेत्र, सातारा, मायणी क्लस्टर संवर्धन राखीव क्षेत्र, अशा पश्चिम घाटातील 8 संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच विदर्भातील महेंद्री व मुनिया या क्षेत्रांनाही संवर्धन राखीवचा दर्जा देण्याला या बैठकीत मान्यता देण्यात आली.
झोनल मास्टर प्लॅन तीन महिन्यात तयार करा
पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अंतिमतः घोषित झाल्यानंतर त्याचा झोनल मास्टर प्लॅन जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यात तयार करावा. हे करताना वन, पर्यावरण, महसूल, नगरविकास अशा संबंधित विभागाचे सहकार्य घ्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. चांदा ते बांद्यापर्यंत जे महाराष्ट्राचे वन वैभव आहे त्याचे विविध ऋतूतील वैशिष्ट्य टिपण्यास वनरक्षकांना सांगावे, त्याचा दर्जा उत्तम राखावा, यावरून राज्यासाठी आपण एक चांगला चित्रपट तयार करू असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्यात पूर्वीचे 6 आणि नवीन घोषित तिलारी अशी मिळून 7 संवर्धन राखीव क्षेत्रे आहेत. त्या क्षेत्रात महत्त्वाची कामे करण्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी द्यावा या वन विभागाच्या मागणीवर प्रस्ताव पाठवण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
आजच्या बैठकीत राज्य वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनी ज्या सूचना केल्या त्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. वाघाप्रमाणे बिबट्या आणि मानव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात, त्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, तसेच महेंद्रीला संवर्धन राखीव घोषित करताना भविष्यात त्याचे अभयारण्यात रुपांतर करण्यापूर्वी लोकांना विश्वासात घेऊन, गावकऱ्यांशी चर्चा करून पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
जंगलावर लोकांचे अवलंबित्व कमी करा
जंगलावर असलेले लोकांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी, विविध उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न वनविभागाकडून सुरू आहे. त्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. तसेच यासाठी वनविभागाला सरकारचे पूर्ण सहकार्य मिळेल असे अश्वासनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले.