मुंबई - 10वी 12वी च्या परीक्षेबाबत लवकर निर्णय घेणार असल्याचे राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले, की विद्यार्थ्यांची सुरक्षा आमची प्राथमिकता आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परीक्षेबाबतचा निर्णय घेतला जाईल.
जितेंद्र आव्हाड व भाई जगताप यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. शिक्षणमंत्री आणि अधिकाऱ्यांची आज यासंबंधी बैठक पार पडली. राज्यातील लाखो विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणार आहेत. मात्र याबाबत संभ्रम कायम आहे. सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आधी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा पास करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना देखील पुढच्या वर्गात वर्गोन्नती देण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला. मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यावर सरकार ठाम आहे.
हे ही वाचा - पंढरपुरात अजित पवारांच्या सभेत कोरोना नियमांचे उल्लंघन; आयोजकांवर गुन्हा दाखल
देशात आणि खासकरुन महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वेगवेगळे निर्बंध घातले गेले आहेत. अशात राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा देखील निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा जूनमध्ये ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन घ्यावी अशी भूमिका राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी मांडली आहे. राज्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता दहावी, बारावीची परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात. कोविडची परिस्थिती आटोक्यात येताच दोन्ही पद्धतीने परीक्षा घ्याव्यात, असे मत भाजप आमदार आशिष शेलार यांनी आज मांडले.
हे ही वाचा - "पहचान कौन? म्हणत शायरीद्वारे अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा