मुंबई - डेक्कन एक्स्प्रेसने मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता मनमुराद सह्याद्रीचे दर्शन धावत्या ट्रेनमध्ये घेता येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई ते पुणे डेक्कन एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे प्रवासादरम्यान सह्याद्रीच्या रांगांचे, घाटांचे निसर्ग सौंदर्य ट्रेनमध्ये बसून सर्व बाजूंनी प्रवाशांना पाहता येणार आहे.
भारतीय रेल्वेद्वारे प्रवाशांना प्रवासादरम्यान निसर्गाचे दर्शन होण्यासाठी अनेक रेल्वे गाड्यात विस्टाडोम कोच लावण्याची सुरूवात केली. डोंगर, नद्या असलेल्या ठिकाणाच्या रेल्वे प्रवासादरम्यान विस्टाडोम लावले जात आहेत. त्यामुळे सीएसएमटी ते पुणे डेक्कन एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच लावले जाणार आहेत. तुर्तास मध्य रेल्वेने कोच कधी लावले जातील, हे स्पष्ट केले नाही. या विस्टाडोमसाठी 4 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.
१८० डिग्रीमध्ये बळणारी आसने-
डेक्कन एक्स्प्रेसला विस्टाडोम कोचला पारदर्शक काचेच्या खिडक्या आणि छत असल्याने संपूर्ण परिसर पाहता येणार आहे. तसेच १८० डिग्रीमध्ये बळणारी आसने, एलसीडी यामुळे प्रवाशांना विस्टाडोम कोचमधून प्रवास करण्याचा वेगळाच आनंद मिळणार आहे. मान्सून काळात पावसाचा, धबधब्यांचा अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे. सर्व बाजूंनी काचेचे आवरण असल्याने ट्रेन बाहेरील संपूर्ण परिसर पाहता येणार आहे.
असा असणार विस्टाडोम कोच -
डेक्कन एक्स्प्रेसच्या विस्टाडोम कोचमध्ये ४०आसने असणार आहे. मोठ्या काचेच्या खिडक्या, काचेचे छत, १२ एलसीडी, फ्रिज, फ्रिजर, ओव्हन, ज्युसर ग्राईंडर, प्रवाशांच्या साहित्यासाठी जागा, बाहेरील दृश्य पाहण्यासाठी विशेष जागा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. छतावरील काचेतून येणारी उष्णता कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू आहे. सूर्यप्रकाशाचा फक्त ४० टक्के उष्णता कोचमध्ये येणार आणि प्रवाशांना उकडणार नाही, अशाप्रकारचे छत बनविले जात आहे. यासह कोचमधील एसीची कुलिंगच्या पद्धतीत बदल केले आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.