मुंबई - मुंबईमध्ये कोरोना प्रसारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्यांच्या संख्येत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. कोरोना काळात कर्करोगासह हृदयविकार, क्षयरोगामुळे मृत्यूचे प्रमाण घटले होते. मात्र, 2021 मध्ये हे प्रमाण पुन्हा वाढल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर आगीत मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
हृदयविकारामुळे मृत्यू, तिप्पट वाढ - आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारांतर्गत मुंबईतील मृत्यूंची माहिती व आकडेवारी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मागवली होती. त्यानुसार मुंबईत 2018 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 8 हजार 601 होती. 2019 मध्ये यात घट होऊन 5 हजार 849 झाली. मात्र, कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये म्हणजेच 2020 मध्ये आणखी घट होऊन 5 हजार 633 मृत्यू नोंदवले गेले. दुसऱ्या लाटेच्या काळात जानेवारी ते जून 2021 या सहा महिन्यांच्या काळात 17,880 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाले आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्यांच्या संख्येत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे.
कर्करोग, कोरोना, आगीच्या मृत्यूत वाढ - कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजेच 2020 मध्ये 2019 च्या तुलनेत कर्करोगाच्या मृत्यूमध्ये 13 टक्क्यांनी घट झाली होती. 2020 मध्ये कर्करोगामुळे 8 हजार 576 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 2021 मध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या काळात 6 हजार 861 मृतांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 2020 मध्ये कोरोनामुळे 11 हजार 105 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 2021 मध्ये जूनपर्यंत 10 हजार 289 कोरोना मृत्यूंची नोंद झाली. भाजल्यामुळे 2020 मध्ये 44 जणांचा मृत्यू झाला होता. 2021 च्या सहा महिन्यातच ही संख्या 108 झाली आहे. 202 0मध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या काळात आगीमुळे 135 जणांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यू संख्येत पुन्हा वाढ - मुंबईत सर्वाधिक कर्करोगाने मृत्यू होतात. कर्करोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण 12 टक्के आहे. त्या खालोखाल हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण 10 टक्के तर क्षयरोगामुळे सुमारे सहा टक्के आहे. 2020 मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाल्यावर कर्करोगासह हृदयविकार, क्षयरोगामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. 2021 मध्ये मात्र यात पुन्हा वाढ झाली आहे.
हेही वाचा - Bacchu Kadu : भविष्यात प्रहारचा मुख्यमंत्री होईल; बच्चू कडू यांना विश्वास