मुंबई - राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave) येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health minister Rajesh Tope) यांनी नुकताच केला आहे. मात्र, तरीही नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे कारण कोरोना रुग्णसंख्या घटली असली तरी मृत्युदर मात्र चिंताजनक आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health minister Rajesh Tope) यांनी राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली. मात्र ही लाट अत्यंत सौम्य प्रमाणात असेल असा दावाही त्यांनी केला आहे. एकीकडे कोरोनाचा रुग्णांमध्ये घट होताना रुग्णांच्या मृत्यु दरात झालेली वाढ मात्र काहीशी चिंताजनक आहे. यासंदर्भात राज्याची आजची नेमकी स्थिती काय आहे हे जाणून घेऊया.
राज्यातील कोरोना रुग्ण स्थिती
राज्यात गुरुवारी ८४८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ९७४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. नव्या बाधित होणाऱ्या रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे, हे दिलासादायक चित्र आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ९१८७ इतकी आहे. मात्र गुरुवारी राज्यभरात ५० कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून हा आकडा मात्र चिंताजनक आहे.
दैनंदिन रूग्ण संख्येत घट
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या घटताना दिसते आहे. गुरुवारी ८४८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असताना ९७४ कोरोना रुग्ण बरे होऊन गेले आहेत तर राज्यात नऊ हजार ३६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ६४ लाख ७९ हजार ३९६ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आता ९७.६८ टक्के इतकं झाले आहे. आज पर्यंत सहा कोटी ५० लाख ४७ हजार ४९१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ६६ लाख ३३ हजार १०५ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. हे प्रमाण १०.२ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ९० हजार ५३८ जण होम क्वारंटाईन आहेत तर १०६५ जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४० हजार ८५७ इतकी झाली आहे.
तिसऱ्या लाटेची, मृत्यूदराची चिंता नको- डॉ.लहाने
कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, ही लाट जरी आली तरी ती अत्यंत सौम्य असेल त्याने कोणताही फरक पडणार नाही असा दावा कृती दलाचे सदस्य डॉक्टर तात्याराव लहाने यांनी केला आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या किंवा त्यावरील मुलांच्या शाळा जरी सुरू केल्या तरी शाळा सुरू केल्याने कोरोनाचा प्रसार मुलांकडून वाढणार नाही अथवा मुलांना त्याची बाधा होणार नाही, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे, त्यामुळे त्याचीही काळजी करण्याची गरज नाही, असेही लहाने यांनी स्पष्ट केले.तर सध्या जरी मृत्यूदर जास्त वाटत असला तरी रुग्णांची संख्या घटल्यामुळे तसे भासत आहे. यातही लवकरच बदल झालेला दिसेल, असेही लहाने यांनी सांगितले.
हेही वाचा - Covid 19 : चिंता वाढली; दक्षिण अफ्रिकेत आढळला कोरोनाचा नवा प्रकार