मुंबई - शहर परिसरात कोरोना विषाणूच्या रुग्णांचा आकडा वाढत असताना मृतांचा आकडाही वाढत आहे. पालिका रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये कोरोनाच्या रुग्णांना 'बोलस' म्हणून अँटीबायोटिक इंजेक्शन दिली जातात. या इंजेक्शनमुळे रुग्णांवर उलटा परिणाम होऊन रुग्णाचा मृत्यू होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका व पालिकेच्या आरोग्य समितीच्या सदस्या सईदा खान यांनी केला आहे. यानंतर आता पालिकेच्या रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांना बोलस इंजेक्शन देताना, ते कसे द्यावे याचे परिपत्रक काढण्यात आले आहे.
मुंबई कोरोना विषाणूचे 'हॉटस्पॉट' बनले आहे. मुंबईत मार्च 11 पासून आतापर्यंत 28 हजार 634 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 949 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी अनेक रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत होते. पालिका रुग्णालयात अतिदक्षता विभाग तसेच 'आयसोलेशन वॉर्ड'मध्ये गंभीर असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. अशा रुग्णांना त्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सलाईन लावले जाते, तसेच त्यामधून अँटीबायोटिक इंजेक्शन बोलस म्हणून दिली जातात.
रुग्णांना सलाईनमधून ही अँटीबायोटिक इंजेक्शन देताना हळूहळू काही काळाच्या अंतराने द्यावी लागतात. मात्र, पालिकेच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या जवळ जावे लागत असल्याने कर्मचारी सलाईनमधून ही इंजेक्शन काही कालावधीमधून न देता, एकाच वेळी देत असल्याने रुग्णांवर त्याचा उलट परिणाम होऊन त्यांचा मृत्यू होत असल्याचा प्रकार निदर्शनास आल्याचे डॉ. सईदा खान यांनी सांगितले.
असे प्रकार रोखता यावेत म्हणून नायर रुग्णालयाचे डीन डॉ. मोहन जोशी यांनी बोलस म्हणून दिली जाणारी इंजेक्शन सलाईनमधून कशी दिली जावीत, याबाबत एक परिपत्रक काढले असून डॉक्टर, परिचारिका यांनी त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.
नायर रुग्णालयाने काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे महापालिकेच्या सर्वच रुग्णालयात परिपत्रक काढले पाहिजे. या परिपत्रकात म्हटल्याप्रमाणे कोरोनाच्या रुग्णांना सलाईनमधून बोलस म्हणून दिली जाणारी अँटीबायोटिक इंजेक्शन एकाच वेळी न देता काही कालावधी ठेवून देण्याची गरज आहे. अशी इंजेक्शन एकाच वेळी दिल्याने रुग्णाचा लगेच मृत्यू होतो. असे 'रिऍक्शन'मुळे होणारे कोरोना रुग्णांचे मृत्यू थांबवल्यास मुंबईमधील कोरोनाच्या मृतांचा आकडाही कमी होऊ शकतो, असे सईदा खान यांनी म्हटले आहे.