मुंबई - काळबादेवी येथील एका व्यावसायिकाला आयकर विभागाची भीती दाखवून खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील तीन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणातील चौथे आरोपी डीसीपी सौरभ त्रिपाठी अद्याप फरार असून मुंबई पोलीस त्यांचा शोध घेत आहे. सौरभ त्रिपाठीच्या शोधाकरिता पाच पथके इतर राज्यात पाठवण्यात आली आहेत. मात्र, अद्याप तरी त्रिपाठी ( DCP Saurabh Tripathi search operation in other states ) यांचा शोध लागलेला नाही. मात्र, त्रिपाठी यांना हवालाद्वारे पैसे पुरवणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये शनिवारी अटक केली असून त्यास आज मुंबईला आणणार आहे.
हेही वाचा - Shiv Abhiyan : शिवसेनेचे 'शिव संपर्क' अभियान, उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन
आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्याभोवतीचा फास मुंबई पोलिसांनी चांगलाच आवळला आहे. त्यांच्या शोधासाठी मुंबई गुन्हे शाखेची पाच पथके उत्तर प्रदेशात गेली आहे. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील एकाला अटक केली असून त्रिपाठींच्या सूचनेनुसार त्याने पोलीस निरीक्षक ओम वांगटेकडून हवालाद्वारे पैसे स्विकारल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्याचे समजते. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडून पोलिसांनी दीड लाखांची रोकड जप्त केली आहे. अंगडियाकडून आरोपींनी 19 लाख रुपये उकळल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांच्या हाती धागेदोरे लागत असल्याने त्रिपाठींच्या अडचणी वाढल्या आहेत.
त्रिपाठीच्या शोधासाठी इतर राज्यात 5 पथके रवाना
व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याच्या आरोपात गुन्हा दाखल झाल्यापासून डीसीपी सौरभ त्रिपाठी कुठे आहे, हे कुणालाही माहीत नाही. सौरभ त्रिपाठीच्या शोधासाठी 5 पथके तयार करण्यात आली आहेत. क्राईम ब्रांचचे पथक सौरभ त्रिपाठीचा उत्तर प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये शोध घेत आहे. परंतु, अद्याप डीसीपी सौरभ त्रिपाठीबद्दल काहीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. मात्र डीसीपी सौरभ त्रिपाठीला हवालाद्वारे पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. आज या व्यक्तीला मुंबईत आणण्यात येणार असून न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
सौरभ त्रिपाठी यांची अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव
खंडणी प्रकरणात अटकेच्या भीतीने सौरभ त्रिपाठी यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. बुधवारी (23 मार्च) या अर्जावर सुनावणी होणार आहे. या शिवाय त्रिपाठी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठीचा अहवाल मुंबई पोलीस आयुक्तालयातून गृहविभागात पाठवण्यात आला आहे.
त्रिपाठींवर गुन्हा दाखस
अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी वसूल प्रकरणात त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील ओम वांगटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाच्या कारवाईची भीती दाखवून अंगडिया व्यवसाय करणाऱ्यांकडून पोलिसांनी खंडणी वसुली केली हेाती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलीस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांची बदली करण्यात आली होती. या बदलीनंतर सौरभ त्रिपाठी हे सुटीवर गेले होते. आता पोलीस त्यांच्या शोधात आहेत. त्यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे.
आरोप काय आहेत?
सौरभ त्रिपाठींविरोधात मुंबई क्राईम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटने काही दिवसांपूर्वीच खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सौरभ त्रिपाठींवर मुंबईतील अंगडियांकडून जबरदस्तीने पैसे उकळण्याचा आरोप आहे. अंगडियांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पोलीस उपायुक्त त्रिपाठी यांनी त्यांच्याकडून काम सुरू ठेवण्यासाठी 10 लाख रूपये मागितल्याचा आरोप आहे.
हेही वाचा - Mumbai High Court : ... तोपर्यंत आई वडीलांच्या संपत्तीवर मुलगी हक्क दाखवू शकत नाही - उच्च न्यायालय