मुंबई- देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात अमली पदार्थ तस्करीच्या संदर्भात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. यात काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक मानला जाणाऱ्या दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकना यास अटक करण्यात आली होती. यानंतर दानिश मर्चंटचा भाऊ रजीक मर्चंट याला सुद्धा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अमली पदार्थांच्या तस्करी संदर्भात चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलेले आहे.
दानिश व रजीक दोघेही दाऊदचे हस्तक
दानिश मर्चंट व त्याचा भाऊ रजीक मर्चंट हे दोघेही अमली पदार्थ तस्करी संदर्भात सतर्क आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या अमली पदार्थांच्या संदर्भात काम करणारी माणसं म्हणून ते ओळखले जातात. 90 च्या काळातील डोंगरी मधील कुख्यात गँगस्टर युसुफ चिकना याची ही दोन मुले आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी दानिश चिकना हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो च्या 2 गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी म्हणून होता.
अमली पदार्थांच्या व्यवसायाला खीळ
यानंतर त्यास राजस्थान मधील कोटा येथून अटक करण्यात आल्यानंतर मुंबईत आणण्यात आले होते. ज्याची कस्टडी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळाली होती. या दोन्ही आरोपींच्या अटकेमुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या व्यवसायाला खीळ बसण्याची शक्यता आहे.