मुंबई - महानगरातील एका बँकेत मोठ्या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याला ईमेलद्वारे सव्वा कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 11 ने धक्कादायक खुलासा केला आहे. चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या या अधिकाऱ्याला 16 जुलै ते 19 जुलै या दरम्यान खंडणीसाठी धमकीचे ईमेल येत होते. या ईमेलमध्ये खंडणी मागणाऱ्या व्यक्तीने तो चायनीज असून 1 लाख रुपये खंडणी न दिल्यास कुटुंबासह जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.
सुरवातीला या व्यक्तीने या ईमेलकडे दुर्लक्ष केले होते. त्या नंतर पुन्हा खंडणीची ईमेल आल्याने त्यात खंडणीची मागणी रक्कम सव्वा कोटीपर्यंत करण्यात आल्याने या बँक कर्मचाऱ्याने या संदर्भात बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर याचा तपास क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चिमाजी आघाव यांच्या नेतृत्वाखाली केला असता, त्यांना हे ईमेल पीडित व्यक्तीच्या मोबाईल फोन वरून करण्यात आल्याचे आढळून आले. या संदर्भात पीडित व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केली असता लॉकडाऊन काळात ही पीडित व्यक्ती वर्क फ्रॉम होम करत होती. या दरम्यान त्यांचा मोबाईल काही वेळा त्यांच्या 2 मुलींपैकी 12 वर्षाच्याया एका मुलीकडे अभ्यासासाठी देत असल्याचे आढळून आले.
छोट्या बहिणीचे अधिक लाड करतात म्हणून मोठ्या बहिणीने केला ईमेल
पीडित बँक अधिकाऱ्याला 2 मुली आहेत. मात्र या दोन मुलीत लहान मुलीचे अधिक लाड होतात, म्हणून 12 वर्षाच्या मोठ्या मुलीने वडिलांना अद्दल घडावी म्हणून त्यांच्याच मोबाईलवरून खंडणी मागणारे ईमेल केले होते, असे पोलीस तपासात आढळून आले. या मुलीला विश्वासात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता तिने आपण स्वतःहून वडिलांना त्रास देण्यासाठी chunhuyang399@gmail.com , congyen58@gma.com , pinching181@gmail.com
या बनावट ईमेल आयडीवरून मेल केल्याचे कबुल केले.
माझे आईवडील माझ्याकडे लक्ष देत नसून सतत रागावतात , छोट्या बहिणीला अधिक लळा लावतात म्हणून आपण वडिलांना पोलिसांनी अटक करावी म्हणून हे ईमेल केल्याचे तिने कबूल केले. या संदर्भात बोरिवली पोलीस ठाण्यास माहिती देण्यात आली असून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.