मुंबई - राज्य सरकारने उद्या (सोमवार) पासून कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक तत्वानुसार मंदिरे आणि प्रार्थना स्थळे उघडण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार मुंबईमधील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर उद्यापासून भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. मात्र त्यासाठी भाविकांना मंदिराचे अॅप डाऊनलोड करावे लागणार असून क्यूआर कोड मिळाला तरच दर्शन घेता येणार असल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.
राज्यात गेले आठ महिने कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्व व्यवहार बंद होते. सोमवारपासून मंदिरे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार उद्यासाठी मंदिर प्रशासनाने कोणत्या प्रकारची तयारी केली आहे, याची माहिती देताना बांदेकर बोलत होते.
क्यूआर कोडने दर्शन -
यावेळी बोलताना दिवसभरात सकाळी 7 वाजल्यापासून भाविकांना सिद्धिविनायकाचे दर्शन घेता येणार आहे. दिवसभरात 1 हजार भाविकांना तर एका तासात 100 भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. यासाठी भाविकांना सिद्धिविनायक टेम्पल हे अॅप डाउनलोड करावे लागणार आहे. त्यातून बुकिंग केल्यावर एक क्यूआर कोड जनरेट होणार असून दिलेल्या वेळेत हा क्यूआर कोड दाखवून दर्शन घेता येणार आहे असे बांदेकर यांनी सांगितले.