मंबुई - लॉकडाऊनच्या काळात देशातील बँकांकडून ग्राहकांना ईएमआय भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र या काळात बँक ग्राहकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे असून सायबर गुन्हेगारांकडून ग्राहकांना लुटण्यासाठी वेगळी पद्धत वापरली जात आहे. पाहा 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील सर्व बँकाना आरबीआयने अधिकाधिक डिजीटल बँकिंग सेवा देण्यास सांगितले आहे. मात्र, याच ऑनलाईन बँकिंगचा गैरफायदा उचलताना सायबर गुन्हेगार दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे येणाऱ्या तक्रारीत बँक ग्राहकांना लुटण्याचे प्रकार वाढल्याचे समोर आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात कशी होते लूट ?
गेल्या काही दिवसांत विविध बँकांच्या ग्राहकांना बँकेतील अधिकारी बोलत असून त्यांच्या कर्जाचे हफ्ते पुढे ढकलण्यासाठी मोबाईल फोनवर काही अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास भाग पाडले जात आहे. यामध्ये ANY DESK, Quick Support, AIRDROID, Team Viewer यासारखे अॅप्लिकेशन डाउनलोड केल्यावर ग्राहकांचा मोबाईल पूर्णपणे सायबर गुन्हेगारांच्या नियंत्रणात येतो. सायबर गुन्हेगाराने सांगितलेले अॅप्लिकेशन डाउनलोड झाल्यावर पीडित ग्राहकाच्या नकळत मोबाईलमधील माहिती लंपास करण्यात येते. तसेच ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून बँकेतील सर्व पैसा रातोरात गायब होतोय.
बँक ग्राहकांनी काय करायला हवे?
लॉकडाऊनच्या काळात जर तुम्हाला कर्जाचे हफ्ते पुढे ढकलण्यासाठी बँकेचा एसएमएस , किंवा बँकेचा अधिकारी बोलत असल्याचे म्हणून फोन आल्यास कुठल्याही परिस्थितीत तुमचा एटीएम कार्ड नंबर , त्यामागील सीव्हीव्ही नंबर, किंवा मोबाईल फोन वर येणारा ओटीपी नंबर या सारखी गोपनीय माहिती समोरच्या व्यक्तीला देऊ नका. देशातील कुठलीही बँक त्यांच्या ग्राहकांकडून अशा प्रकारची गोपनीय माहिती फोन करून घेत नाही त्यामुळे तुम्ही वेळीच सावध व्हा!