मुंबई – लॉकडाऊन काळात सत्ताधारी व विरोधकांकडून स्थलांतरित कामगारांबाबत राजकारण होताना दिसून येतंय. दिशाभूल करणारी माहिती प्रसारित झाल्याने वांद्रे टर्मिनस परिसरात परप्रांतीय मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे येथे सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजल्याचे चित्र दिसून येत आहे.
वांद्रे टर्मिनसवर बसमधून स्थलांतरित कामगारांना आणण्यात आलं. त्यावेळी सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली. मात्र उन्हात उभं राहावं लागतं असल्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली घोळक्याने हे कामगार व त्यांचे कुटुंबीय रेल्वेची प्रतीक्षा करताना पाहायला मिळाले.
उन्हापासून बचाव करताना त्यांना कोरोनापासून अटकाव करण्यासाठी सामाजिक अंतर राखण्याचे भानही राहिले नसल्याचे दिसून येते. लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून काम नसल्याने हाती पैसेच उरले नाहीत, त्यामुळे नाईलाजाने गावी जात असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी आलेल्या मजुरांनी व्यक्त केली. मात्र लॉकडाऊन संपल्यावर पुन्हा रोजीरोटीसाठी मुंबईत येणार असल्याचे देखील त्यांनी आवर्जून सांगितले.