मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या घरी आणि कार्यालयांवर केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत छापे टाकण्यात आले आहे. यावरून आज शिवसेनेने पुन्हा एकदा संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे. दोन वर्षांपासून महाराष्ट्रात 'ठाकरे' सरकार काम करीत आहे. हे सरकार नीट चालू नये म्हणून दिल्लीश्वरांनी मोठा खटाटोप आणि आटापिटा चालवला आहे. खोटेपणाची सर्व आयुधे वापरून सरकारच्या पाठीत घाव घालण्याची एकही संधी राजकीय विरोधकांनी सोडली नाही, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात -
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून कळपात वाघ शिरल्यावर मेंढरांची जशी अवस्था होते, तशी अवस्था भारतीय जनता पक्षाची झाली आहे. सध्या या मंडळींची जी बेताल वक्तव्ये चालली आहेत, त्या बातम्या वाचून आणि ऐकून लोकांची तर खूप करमणूक होत असते. पुन्हा 'धाड' प्रयोगही सुरूच आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर दसऱयाचे सोने लुटायला महाराष्ट्र सज्ज झाला आहे. महाराष्ट्र हा सोन्यासारखा प्रदेश आहे. हे राज्य कायम तेजस्वी सूर्यासारखे तळपत राहिले. त्याच तेजाची माणसे येथे जन्मास आली. त्यामुळे विचारांचे सोने महाराष्ट्र सदैव उधळत राहिला. दोन वर्षांपासून महाराष्ट्रात 'ठाकरे' सरकार काम करीत आहे. हे सरकार नीट चालू नये म्हणून दिल्लीश्वरांनी मोठा खटाटोप आणि आटापिटा चालवला आहे. खोटेपणाची सर्व आयुधे वापरून सरकारच्या पाठीत घाव घालण्याची एकही संधी राजकीय विरोधकांनी सोडली नाही. त्या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राला शमीच्या झाडावरील शस्त्र: आता काढावीच लागतील. महाराष्ट्राला कमजोर करायचे, महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान मोडून काढायचा हे दिल्लीचे धोरणच आहे, पण या बेईमान धोरणाची पालखी वाहणारे सूर्याजी पिसाळ आजही महाराष्ट्रात निपजत आहित व महाराष्ट्राला याच दुश्मनांपासून सगळ्यात जास्त धोका आहे, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
कोळसा तुटवड्यावरुनही केंद्राला केले लक्ष -
देशातल्या कोळसा तुटवड्यावरुनही सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रावर लोड शेडिंग म्हणजे अंधाराचे संकट कोसळताना दिसत आहे. केंद्र सरकारने कोळशाच्या बाबतीत जो ढिसाळ आणि भ्रष्ट कारभार केला, त्यामुळे महाराष्ट्रासह पाच राज्ये अंधारात ढकलली जातात की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. एकाएकी ही कोळसा टंचाई का निर्माण झाली? केंद्र सरकारने मर्जीतल्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी कृत्रिम कोळसा टंचाई निर्माण केली की काय? असे प्रश्न विचारले जात आहेत. कारण केंद्र सरकारवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. उद्योगपतींच्या फायद्यासाठी हे 'व्यापारी' सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी कोणत्याही थराला जाऊ शकते. केंद्रातले भाजप सरकार म्हणे आझादीचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. पण देशात बोलण्याचे, लिहिण्याचे स्वातंत्रय आज खरेच उरले आहे का? जे सरकारला प्रश्न विचारतात, खडे बोल सुनावतात त्यांच्यावर सीबीआय, ईडी, एनसीबी, आयकर खात्याच्या धाडी घालून दहशत निर्माण केली जाते. खोटे गुन्हे दाखल करून रावणी राज्याची पताकाच फडकवली जाते. याला काय स्वातंत्र्य म्हणायचे, असा प्रश्नही अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.
'संपूर्ण देश जणू बंदिवान बनवला' -
लखीमपूर घटनेवर पुन्हा एकदा भाष्य करत या घटनेतील आरोपी आशिष मिश्राला अटकेवरूनही भाजपाला खडे बोल सुनावले आहे. शेतकऱयांना त्यांचे हक्क मागण्याचे स्वातंत्र्य नाही. आपले न्याय्य हक्क लोकशाही मार्गाने मागणाऱ्या शेतकऱयांना मंत्रीपुत्र गाडीखाली चिरडून मारतात. पुन्हा शेतकऱयांना चिरडून मारणाऱ्या या गुन्हेगारांना अटक करा, अशी मागणी करण्याचे स्वातंत्रय राजकीय पक्षांना नाही. ती मागणी करणाऱया प्रियंका गांधीना तुरुंगात डांबले जाते. बेरोजगारांना काम करण्याचे स्वातंत्र्य नाही. विद्यापीठांत मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. संपूर्ण देश जणू बंदिवान बनवला आहे. बेडय़ांत जखडून टाकला आहे. कसली आहे आझादी? कसले स्वातंत्र्य उरले आहे? तेव्हा आझादीचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे ढोंग करू नका. या ढोंगाचा बुरखा फाडण्याचे काम आता एकत्रितपणे करायला हवे, असे अग्रलेखात म्हटले आहे.
हेही वाचा - देशातील युवकांमध्ये व्यसनाधीनधा वाढली - सरसंघचालक मोहन भागवत