मुंबई - मुंबईत ( Mumbai ) पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी साठा कमी होऊ लागला आहे. सध्या धरणामध्ये जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणी साठा आहे. जूनच्या अखेरपर्यंत पुढील १२ दिवसात पाऊस ( Rain ) पडला नाही तर मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जाऊ शकते.
जुलै अखेरपर्यंतचा पाणीसाठा - मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी या धरणामधून रोज ३८५० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. मुंबईला वर्षाला १४ लाख दशलक्ष लिटर इतका पाणी साठा लागतो. धरणामध्ये सध्या १ लाख ६० हजार ८३१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी १ लाख ८६ हजार ७१९ दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा होता. मुंबईला पाणपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये सध्या ११ टक्के पाणी साठा आहे. हा पाणी साठा ३० ते ३५ दिवस पुरेल इतकाच म्हणजेच जुलै अखेरपर्यंत पुरेल इतकाच आहे.
जूनच्या अखेरीस आढावा - जून ते सप्टेंबर असे चार महिने पाऊस पडतो. मुंबईत दरवर्षी उशिरा पावसाला सुरुवात होते. कित्येक वेळा एका महिन्यात जोरदार पाऊस पडला तरी मुंबईला लागणारा पाणी साठा जमा होतो. यामुळे जून महिन्याच्या अखेरीस पाणी साठा किती आहे याचा आढावा घेवून पाणी कपातीबाबत निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून देण्यात आली आहे.
तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
- तलाव पाणीसाठा
- अप्पर वैतरणा 0
- मोडक सागर 48357
- तानसा 6088
- मध्य वैतरणा 23719
- भातसा 76788
- विहार 3715
- तुलसी 2164
हेही वाचा - Vidhan Parishad Election 2022 : हॉटेल पॉलिटिक्समध्ये आमदारांसाठी कोट्यावधींचा चुराडा; तरीही धाकधुक कायम