मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Assembly By Election Update) काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर एकंदरीत या निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार मुरजी पटेल विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके (Murji Patel Vs Rituja Latke) यांच्या खरी लढत होत आहे. या निवडणुकीमध्ये अनेक समीकरणे बदललेली असताना ५२ वर्षानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) शिवसेना, उद्धव बाळासाहे ठाकरे यांना पाठिंबा (CPI support ShivSena Uddhav Balasaheb Thackeray ) दिला आहे.
५२ वर्षाने भगव्याच्या पाठीशी लालबावटा - राज्यात एकनाथ शिंदे गटाने बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे - देवेंद्र फडवणीस यांचे सरकार अस्तित्वात आले. हे नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच अंधेरी पूर्व, पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आपली ताकद दाखवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली असून यामध्ये अनेक समीकरणे बदललेली आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्ष अर्थात भाकपने या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत राजकीय हाडवैरी असलेले हे दोन्ही पक्ष भाजपचा पाडाव करण्यासाठी एक दिलाने निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत याच मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढलेल्या मुरजी पटेल यांना तब्बल ४५ हजार मतं भेटली होती. मूरजी पटेल यांचा या मतदारसंघांमध्ये बऱ्यापैकी वर्चस्व असून त्यांना टक्कर देण्यासाठी भगव्याच्या पाठीशी लालबावटा उभा राहिलेला आहे.
म्हणून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा?
राज्यातील सत्ता बदलानंतर महाराष्ट्र बरोबर देशाच्या राजकारणातील संदर्भ सुद्धा सध्या बदललेले आहेत. राजकारणात परिस्थिती अनुसार भूमिका घ्यावी लागते. एकेकाळी एकमेकांचे हाडवैरी असलेले भाकप व शिवसेना हे दोन पक्ष आता भाजपचा पाडाव करण्यासाठी एकत्र मैदानात उतरणार आहेत. केंद्रातील सत्ताधारी भाजपचा कारभार हुकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे. पुन्हा मनुवाद आणण्याची कृती, संसदीय कामकाजातील एकाधिकारशाहीचा वाढता प्रभाव, विविध संविधानिक स्वायत्त संस्थांमध्ये गैरवाजवी हस्तक्षेप, प्रादेशिक पक्षांचे उच्चाटन करण्याचे भाजपचे मनसुबे, यामुळे जाणीवपूर्वक पक्षाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे भाकपच्या राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी सांगितले आहे.
मुरजी पटेल यांना धक्का?
अंधेरी पूर्व मतदारसंघांमध्ये एमआयडीसी हा फार मोठा भाग आहे. या एमआयडीसी मध्ये भाकपशी संलग्न आयटकचे काम मोठ्या प्रमाणात आहे. याच मतदारसंघात फेरीवाले, नाका कामगार अशा असंघटित क्षेत्रातही भाकपचे काम आहे. भाकप त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीच्या प्रचारात उतरवणार असल्याने इथे मुरजी पटेल यांना मोठा धक्का बसू शकतो. तब्बल ५२ वर्षानंतर भाकप शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला असून राज्यातील समीकरण बदललेली असताना या बदललेल्या नवीन समीकरणाचा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला नक्कीच फायदा होऊ शकतो.
काळाने उगवलेला सूड आहे, भाजपची टीका - भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शिवसेनेला दिलेल्या पाठिंबावरून भाजपने उद्धव ठाकरे यांच्या गटावर टीका केली आहे. मुंबईतील कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांची हत्या झाल्यानंतर शिवसेनेने मुंबईत पाय रोवले होते. कम्युनिस्टांचा प्रभाव संपविणाऱ्या त्याच शिवसेनेवर कम्युनिस्टांचा पाठिंबा घेण्याची वेळ यावी हा काळाने उगवलेला सूड आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. राजकीय पक्षांना आव्हान देणाऱ्या शिवसेनेकडे हिंदुत्वाच्या विचाराची शक्ती असून ती शक्तीच काढून घेण्याचा एक व्यापक कट या विरोधकांनी आखला. त्याचाच भाग म्हणून अगोदर उद्धव ठाकरे यांचे गोडवे गायले गेले. मग त्यांना पाठिंबा देऊन हिंदुत्वापासून दूर ओढले गेले. आता ठाकरेंची शिवसेना या कटात पुरती फसल्याचे स्पष्ट झाल्यावर याच कटाचा पुढचा अंक म्हणून उद्धव ठाकरे यांना सहानुभूती दाखविण्याचा कांगावा सुरू असल्याचा आरोपही केशव उपाध्ये यांनी केला आहे.