मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बीकेसी, दहिसर, मुलुंड आदी कोविड सेंटर येत्या १२ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने सुरु केली जाणार आहेत. मुंबईतील कोविड सेंटरमधील खाटा २० हजारपर्यंत वाढवल्या जात असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - Maharashtra Corona: सणवारामुळे तिसऱ्या लाटेचा राज्याला धोका - राजेश टोपे
- कोविड सेंटर सज्ज -
मुंबईमध्ये गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रसार कमी झाला. मात्र फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली. ही लाट ओसरत असतानाच तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने पालिकेने पालिका रुग्णालय, सरकारी रुग्णालय तसेच जंबो कोविड सेंटरमधील बेड्स सज्ज केले जात आहेत. मुंबईत जून महिन्यात आलेल्या तौक्ते वादळादरम्यान बांद्रा बीकेसी, दहिसर, मुलुंड, भायखळा येथील कोविड सेंटर बंद करण्यात आले होते. त्याची दुरुस्ती करून ही सेंटर सज्ज ठेवण्यात आली आहेत. येत्या १२ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्प्याने सुरु केली जाणार आहेत.
- कोविड सेंटरमध्ये २० हजार खाटा -
मुंबईत मालाड, सायन चुनाभट्टी सोमय्या मेडिकल सेंटर आणि कांजुर मार्ग या तीन ठिकाणी प्रत्येकी दोन हजार खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारले आहे. सध्या बीकेसी, वरळी, गोरेगाव येथील नेस्को जम्बो कोविड सेंटर उभारताना आवश्यकतेनुसार विस्तार करण्याची योजना आखण्यात आली आहे. या सर्व केंद्रात गरजेनुसार प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे सहा हजार अधिक खाटा उभारण्यात आल्या आहेत. यामुळे कोविड सेंटरमधील खाटांची संख्या २० हजार इतकी झाली आहे.
- आयसीयू, पेडियाट्रिक वॉर्ड उपलब्ध -
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जम्बो कोविड सेंटर सुरू करताना ७० टक्के ऑक्सिजन बेड, १० टक्के आयसीयू उपलब्ध करण्यात येत आहेत. तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे जम्बो सेंटरमध्ये लहान मुलांसाठी वॉर्ड असेल. पालकांना या ठिकाणी थांबण्याचीही व्यवस्था करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडुन सांगण्यात आले.
- १२ ऑगस्टपासून बीकेसी कोविड सेंटर सुरु -
बांद्रा बीकेसी येथील पहिले जम्बो कोविड सेंटर जून महिन्यातील तौक्ते वादळादरम्यान बंद केले होते. याठिकाणी डागडूजी करून हे केंद्र सज्ज केले जात आहे. सेंटरमध्ये २०० बेड्स लहान मुलांसाठी सज्ज करण्यात आल्याची माहिती कोविड सेंटरचे डीन डॉ. राजेश ढेरे यांनी दिली.
- या ठिकाणी आहेत कोविड सेंटर
बांद्रा बीकेसी, वरळी एनएससीआय, गोरेगाव नेस्को, मुलुंड, दहिसर, कांजूरमार्ग, चुनाभट्टी, भायखळा, महालक्ष्मी, मालाड.
हेही वाचा - . . .तर किती नागरिकांना घरी जाऊन लस दिली, शपथपत्र सादर करा: उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला निर्देश