मुंबई - महापालिकेच्या कोरोना विरोधातील लढ्याला यश येत आहे. मुंबईत कोरोना दुपटीचा कालावधी दिवसेंदिवस वाढत असून गुरुवारी हा कालावधी ९० दिवसांवर पोहचला आहे. रुग्ण वाढीचा सरासरी दरही कमी होऊन ०.७८ टक्केवर आला आहे. तर रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही ८० टक्के झाले आहे. त्यामुळे हळूहळू कोरोना नियंत्रणात येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
उपचार पद्धती, प्रभावी उपाययोजना कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा तत्काळ शोध घेऊन क्वारंटाईन, आरोग्य तपासणी, स्क्रिनिंग, कंटेन्मेंट झोनची कठोर अमलबजावणी, वाढवण्यात आलेलेल्या चाचण्या आदींमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणे पालिकेला यश येते आहे.
हेही वाचा - चिंता वाढवणारी बातमी! कोरोना पॉझिटिव्हिटीमध्ये महाराष्ट्र देशात तिसरा
मुंबईत रुग्ण वाढीचा कालावधी वाढत जात असून ९० दिवसांवर पोहचला आहे. रुग्ण वाढीचा सरासरी दरही कमी होत आहे. २४ पैकी तब्बल ९ विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी १०० दिवसांच्या वर गेला आहे. तर पाच विभागात ९० दिवसांवर, चार विभागात ८० दिवसांवर, एक विभागात ७० दिवसांवर व चार विभागात ६० दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन ०.७८ टक्केवर आला आहे. २४ पैकी १९ विभागात हा सरासरी दर १ टक्केपेक्षा कमी असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
दिनांक १९ ऑगस्टपर्यंत रुग्णांची संख्या १ लाख ३१ हजार ५४२ झाली असली, तरीही यातील तब्बल १ लाख ६ हजार ५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ७ हजार २६५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या अॅक्टीव १७ हजार ९१७ रुग्ण आहेत.
असा वाढला रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी...
- २२ मार्च -- ३ दिवस
- १५ एप्रिल -- ५ दिवस
- १२ मे --- १० दिवस
- २ जून -- २० दिवस
- १६ जून --- ३० दिवस
- २४ जून -- ४१ दिवस
- १० जुलै -- ५० दिवस
- २२ जुलै -- ६० दिवस
- २८ जुलै -- ७० दिवस
- ३ ऑगस्ट -- ८० दिवस
- १९ ऑगस्ट -- ९० दिवस