मुंबई - मुंबई महापालिकेत काम करणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोरोनामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये दिव्यांग कर्मचारी कामावर आले नसतील, तरी देखील त्यांना पगार व इतर भत्ते मिळणार आहेत. तसा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिला आहे. लॉकडाऊन काळात कामावर हजर नसलेल्या कर्मचाऱ्यांना पगार व भत्ते न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला हेता. यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत, दिव्यांग कर्मचाऱ्यांना पगार व इतर भत्ते देण्याचे आदेश दिले आहेत.
हे थकीत वेतन दोन टप्प्यांत देण्यात यावे, वेतन न दिल्यास ते कायद्याचे उल्लंघन असेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. पहिला टप्पा हा दिवाळीपूर्वी देण्यात यावा, तर दुसरा टप्पा हा त्यानंतर 45 दिवसांच्या आता देण्यात यावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेतन न देण्याच्या निर्णयाविरोधात नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत दिव्यांगांना वेतन व इतर भत्ते देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.