मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 18 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मागील वर्षी ईडीकडून देशमुख यांना अटक करण्यात आली होती. सध्या देशमुख न्यायालयीन कोठडीत आहेत. माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुंबईतील बार अँड रेस्टॉरंटच्या मालकाकडून निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शंभर कोटी रुपये वसुली करण्याचे टार्गेट देशमुख यांनी दिल्याचा आरोप पत्राद्वारे केल्यानंतर त्यांच्या विरोधात ईडीने चौकशी सुरू केली होती.
डिफॉल्ट याचिका लावली फेटाळून - यापूर्वी मुंबईच्या विशेष न्यायालयानेही अनिल देशमुख यांना दिलासा दिला नव्हता. 100 कोटींची वसुली आणि मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीने 2 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांना अटक केली होती. मुंबईच्या विशेष न्यायालयाने 18 जानेवारी रोजी त्यांची डिफॉल्ट याचिका फेटाळून लावली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोप प्रकरणी देशमुखांना दिलासा मिळू शकला नाही. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे मार्फत डिसेंबर 2020 ते मार्च 2021 दरम्यान बारमालकांकडून खंडणी वसुली करण्यात आली आहे. हा पैसा वाझेने देशमुखांना दिला होता. देशमुखांनी या पैशाचा वापर आपल्या व्यवसायासाठी केल्याचा आरोप ईडीने लावलेला आहे.
अनिल देशमुख यांच्याविरोधात 7 हजार पानी आरोपपत्र - 100 कोटी कथित वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर गेल्या 78 दिवसांपासून अनिल देशमुख हे जेलमध्ये आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात ईडीने 7000 पानाचे पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे. तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांच्या पत्नीचा भाऊ यांना देखील सहआरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे.
काय आहे प्रकरण? - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.