मुंबई - बसमधील कंडक्टर प्रवाशांना सारखा आगे बढो आगे बढो सांगत असतो. असेच आगे बढो आगे बढो म्हणत देशाला पुढे नेणारा पंतप्रधान पाहिजे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावला आहे. यावेळी परिस्थिती बघून लोकल ट्रेन व हॉटेल सुरु करण्याबाबत निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा - सीएसएमटी, अमिताभ यांच्या बंगल्याजवळ बॉम्ब ठेवल्याची अफवा, जालन्याच्या दोघांना ठाण्यातून अटक
बेस्ट उपक्रमाच्या इलेक्ट्रिक बस आणि माहीम येथील बस डेपोचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
- बेस्टचा प्रवास अभिमानास्पद -
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, बेस्टचा प्रवास नक्कीच अभिमानास्पद आहे. 1874 ची बेस्ट ही घोडागाडी होती. कालानुरूप त्यात बदल होत गेले. माँ आणि बाळासाहेब आम्हाला ट्राममधून फिरायला न्यायचे. अजूनही ट्रामच्या पुसटशा आठवणी आहेत. मी शाळेत बेस्ट बसमधून जात होतो. आता बेस्टच्या ताफ्यात पर्यावरण पूरक अशा इलेक्ट्रिक बस दाखल होत आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच हे आधुनिकरण होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
- माहीम बस डेपो, सीमा आंदोलन -
बेस्टच्या माहीम बस डेपोचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याबाबत बोलताना 1969 साली माहीम बस डेपोजवळ सीमा आंदोलनाची सुरुवात झाली होती. ती एक आठवण या बस डेपोची आहे याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांची ने-आण तुम्ही केली आहेत. आतासुद्धा तुम्ही ते काम करत आहात. जनतेची सेवा करण्याचे काम बेस्ट कर्मचारी करत असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
- बेस्टच्या ताफ्यात 222 इलेक्ट्रिक बस -
बेस्टने पर्यावरण रक्षणासाठी आपल्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ओलेक्ट्रा या कंपनीकडून काही इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर टाटा कंपनीकडून बसेस भाडेतत्वावर घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. टाटाकडून 175 मिनी व 175 मोठ्या इलेक्ट्रिक गाड्या बेस्टच्या ताफ्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे बेस्टचा ताफा 4 हजार बसचा करण्यात येत आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 24 मोठ्या इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे बेस्टच्या ताफ्यात एकूण 222 इलेक्ट्रिक बस आतापर्यंत आल्या आहेत. या बस चार्जिंग करण्यासाठी शिवाजी नगर, मालवणी आणि बॅक बे डेपो येथे चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा - आरक्षणाच्या बाबतीत केंद्र सरकार जबाबदारी झटकत आहे - वडेट्टीवार