मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आपल्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या १९१६ या क्रमांकावर हॉस्पिटलमधील बेड आणि अॅम्ब्युलन्सची माहिती उपलब्ध करून दिली आहे. तसेच विभागवार वॉर्ड वॉर रुम कार्यान्वयीत केले आहेत. यानंतर आता पालिकेने स्मशानभूमीची सद्यस्थितीची माहिती १९१६ वर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी याबाबतचा 'डॅश बोर्ड' बनवला जात असून त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 53985 वर पोहोचला आहे. त्यापैकी 1952 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत रोज कोरोनामुळे 25 ते 30 मृत्यू होत होते. त्यात वाढ होऊन आता 90 हुन अधिक मृत्यू होत आहेत. यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना स्मशानभूमीत रांगा लागत आहेत. तसेच काही ठिकाणी दहन वाहिन्या बंद असल्यास मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांची पळापळ होत आहे. यावर उपाय म्हणून पालिकेच्या आरोग्य विभागाकडून पालिकेच्याच माहिती तंत्रज्ञान खात्याच्या सहकार्याने यावर काम सुरू आहे. या महिन्याच्या अखेरीस हा 'डॅशबोर्ड' कार्यान्वित केला जाणार आहे. ज्यामुळे स्मशानभूमींच्या सद्यस्थितीची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या १९१६ या क्रमांकावर उपलब्ध केली जाणार आहे.
'अशी' आहे मुंबईतील स्मशानभूमीची सद्यस्थिती
मुंबईत महापलिकेच्या पारंपरिक पद्धतीने दहन संस्कार करण्यासाठी ४६ ठिकाणी २१९ चिता स्थाने आहेत. तर ११ ठिकाणी विद्युत व गॅस दाहिनी असून तिथे १८ शवदाहिनी आहेत. महापालिका क्षेत्रात एकूण २३७ चिता स्थाने असून यांची क्षमता २४ तासात १ हजार ४५८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची आहे. तर विद्युत वा गॅस दाहिनींमध्ये एका मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर सदर दाहिनी काही कालावधीसाठी बंद ठेवली जाते. तर कधी आवश्यक ती देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ते बंद ठेवावे लागते. यामुळे एका विद्युत वा गॅस दाहिनींमध्ये २४ तासात साधारणपणे ८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार होऊ शकतात. या प्रकारची १८ चितास्थाने महापालिका क्षेत्रात आहेत. त्यावर चोवीस तासात साधारणपणे १४४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येऊ शकतात. पारंपरिक पद्धतीनुसार जळाऊ लाकूड वापरुन अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिका क्षेत्रात २१९ चितास्थाने आहेत. या प्रत्येक चितास्थानाची कमाल क्षमता २४ तासात साधारणपणे ६ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची आहे. तर २१९ चितास्थानांची एकत्रित क्षमता ही २४ तासात साधारणपणे १ हजार ३१४ मृतदेहांवर अत्यंसंस्कार करण्याची आहे.
महापालिकेच्या अखत्यारितील स्मशानभूमींची व तेथील चितास्थानांची सरासरी क्षमता ही २४ तासात सुमारे १ हजार ४५८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची आहे. स्मशानभूमीतील दाहिनीची देखभाल दुरुस्ती, इंधन यासाठी काही वेळ या दाहिन्या बंद ठेवाव्या लागतात. यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना उशीर लागतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन स्मशानभूमींच्या सद्यस्थितीची माहिती नागरिकांना सहजपणे उपलब्ध व्हावी, या उद्देशाने नागरिकांच्या सुविधेसाठी १९१६ या दूरध्वनी क्रमांकाशी संलग्न असा संगणकीय 'डॅशबोर्ड' महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या पुढाकाराने व माहिती तंत्रज्ञान खात्याच्या सहकार्याने विकसित करण्यात येत आहे.