मुंबई - पूर्व उपनगरातील देवनार परिसरातील रहेजा एक्रोपोलीस या वसाहतीमध्ये 'सुराना हॉस्पिटल'च्या साहाय्याने आयोजित करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आला.
रहिवाशांशी संवाद
लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने खासगी रहिवासी वसाहतींना आपल्या आवारात लसीकरण मोहीम राबविण्याची परवानगी दिल्यानंतर, दक्षिण-मध्य मुंबईत राबविण्यात येणारी ही पहिली मोहीम आहे. या शुभरंभाप्रसंगी खासदार शेवाळे यांच्यासह अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. रहेजा एक्रोपोलीस सोसायटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत सोसायटीमधील राहिवाशांसोबतच सोसायटीत घरकाम करणाऱ्या महिला, ड्राइवर, सुरक्षारक्षक अशा सुमारे 600 जणांना कोविशील्डची पहिली मात्रा देण्यात आली. यावेळी खासदार राहुल शेवाळे यांनी रहिवाशांशी संवाद साधून लसीकरणानंतरही खबरदारी घेऊन सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात
मुंबईत काल २८ हजार ४८० कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १ हजार २६६ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत काल १ हजार २६६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत मृतांची संख्याही गेली अनेक दिवस चढ-उतार करत आहे. गुरुवारी मुंबईत ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हीच संख्या बुधवारी ३४ इतकी होती. मुंबईत २० मे ते २६ मेपर्यंतचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर ०.१९ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या ४१ अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन तर १७९ अॅक्टिव्ह सीलबंद इमारती आहेत.
लसीचा तुडवडा लवकर सुटेल?
लसींच्या तुटवड्यामुळे मुंबई महानगरपालिकेने ग्लोबल टेंडर काढत लस आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून मुंबईकरांना लवकरात लवकर कोविड प्रतिबंधक लस देण्यात येईल. महानगरपालिकेतर्फे जास्तीत जास्त लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहे. जर बीएमसीने काढलेल्या या ग्लोबल टेंडरला चांगला प्रतिसाद मिळाला तर काही महिन्यातच मुंबईतील नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल, अशी रचना पालिकेतर्फे करण्यात आले आहे.