मुंबई - कोरोना विषाणूचे मुंबई शहर परिसरात रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यापैकी लक्षणे नसलेल्या म्हणजेच असिंटमॅटिक रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. आयसीएमआरच्या गाईडलाईन प्रमाणे हे रुग्ण कोरोनाचा प्रसार करू शकत नाहीत यामुळे अशा रुग्णांना होम क्वारंटाईन केले जात आहे. अशा रुग्णांची घरच्याघ री चांगली काळजी घेतली जाते त्यामुळे असे रुग्ण घरीच बरे होत असल्याने पालिकेच्या क्वारंटाईन सेंटर आणि प्रशासनावर येणारा अनावश्यक भार कमी होत आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
आपल्या विभागात, इमारतीत, चाळीत, बाजूच्या घरात कोरोनाचा रुग्ण आढळून आला म्हणून नागरिकांमध्ये भीती निर्माण होते. त्या रुग्णामुळे आपल्यालाही कोरोनाची लागण होईल अशी भीती सर्वांना असते. मात्र, ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांकडून इतरांना कोरोनाचा प्रसार होत नाही, असे जागतिक आरोग्य संस्था आणि आयसीएमआरने स्पष्ट केले आहे. यामुळे आयसीएमआरच्या गाईडलाईनप्रमाणे लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना होम क्वारंटाईन केले जात असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.
हेही वाचा - मुंबईत कोरोनाचे सावट; नाशिकच्या निसर्गरम्य वातावरणाला चित्रीकरणासाठी पहिली पसंती
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या पण लक्षणे नसलेल्या रुग्णाच्या घरात जागा आहे, कमी व्यक्ती आहेत, घरात शौचालय असल्यास त्याला होम क्वारंटाईन केले जाते. मात्र पॉझिटिव्ह आलेला व लक्षणे नसलेला रुग्ण चाळ किंवा झोपडपट्टीत राहत असल्यास, त्याच्या घरात जागा कमी असते, सार्वजनिक शौचालय असते. त्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने अशा रुग्णाला पालिकेच्या किंवा संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईन केले जाते. लक्षणे नसलेले बहुतेक रुग्ण क्वारंटाईन सेंटरमध्ये जाण्यास तयार होत नसतात. त्यांच्या घरात जागा असते, शौचालय असते, काळजी घेणारे लोकही असतात. त्यामुळे त्यांना घरीच क्वारंटाईन केले जाते. पालिकेचे डॉक्टर त्यांच्या सोबत फोन, व्हडिओ कॉलद्वारे त्यांच्या संपर्कात असतात. घरीच क्वारंटाईन केल्याने रुग्णालय, केअर सेंटर यामधील रुग्णांची संख्या कमी झाल्याने डॉक्टर नर्स यावरील ताणही कमी होतो. होम क्वारंटाईनमधून रुग्ण आणि पालिका या दोघांना फायदा झाल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
62 टक्के रुग्ण लक्षणे नसलेले -
7 जुलैच्या आकडेवारी प्रमाणे मुंबईत एकूण 86132 रुग्ण आहेत. त्यापैकी 58137 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 4999 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 22996 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 14190 लक्षणे नसलेले रुग्ण तर 7757 लक्षणे असलेले रुग्ण आहेत. 1049 रुग्ण क्रिटिकल अवस्थेत आहेत.सध्या अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 62 टक्के रुग्ण लक्षणे नसलेले, 34 टक्के रुग्ण लक्षणे असलेले तर 4 टक्के रुग्ण क्रिटिकल अवस्थेत आहेत.
2,38,179 रुग्ण होम क्वारंटाईन -
मुंबईमधून आतापर्यंत 1364607 रुग्णांनी क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. सध्या 238179 रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. 10330 रुग्ण कोरोना केअर सेंटर 1 मध्ये इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. मुंबईत सध्या 744 झोपडपट्टी आणि चाळ असलेले विभाग कंटेन्मेंट झोन आहेत. तर 6665 इमारतीमधील काही मजले किंवा विंग सिल करण्यात आले आहेत.
हेही वाचा - ग्रामीण भागात प्रत्येक घराला पाणी; जल जीवन मिशन राबविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता