मुंबई - महापालिकेच्या सायन रुग्णालयात कोरोना मृतदेहांच्या बाजूलाच काही रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारची गंभीर दखल मुंबई महानगरपालिकेने घेतली आहे. कोरोनाचे मृतदेह वेगळे ठेवण्याची व्यवस्था शवागृहात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. तसेच कोरोनाचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांनी देखील पुढे यावे, असेही आवाहन महापौरांनी केले आहे.
हेही वाचा... धक्कादायक! कोरोना मृतदेहांच्या बाजूला रुग्णांवर उपचार, सायन रुग्णालयातील प्रकार
मुंबईच्या सायन रुग्णालयात कोरोना विषाणूच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या वॉर्डमध्ये प्लॅस्टिकमध्ये बांधून ठेवलेल्या मृतदेहांच्या बाजूलाच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा व्हडिओ आमदार नितेश राणे यांनी एका ट्विटद्वारे उघडकीस आणला आहे. यावर संतप्त प्रक्रिया उमटू लागल्या आहेत. कोरोनाचे मृतदेह तासंतास वॉर्डमध्ये पडून राहिल्याने कोरोनाचा प्रसार होणार असून डॉक्टर, नर्स, रुग्ण तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत प्रसारमाध्यमात बातम्या आल्यावर त्याची महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे.
कोरोनाच्या रुग्णाचा मृतदेह असल्याने तो ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक पुढे येत नाहीत. प्रत्येक जाती धर्माचे वेगळे धार्मिक विधी असल्याने या मृतदेहांवर अत्यंसंस्कार पालिका करू शकत नाही. नातेवाईकांना अंत्यसंस्कार करायचे नसल्यास त्यांनी पालिकेला तसे कळवल्यास पालिका अंत्यसंस्कार करू शकते. कोरोनाचा मृतदेह प्लास्टिकमध्ये बंद केलेला असतो. तसेच मृतदेह ताब्यात घेणाऱ्यांना पीपीई किट दिले जाते. त्यामुळे नातेवाईकांनी भीती न बाळगता मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
हेही वाचा... लाॅकडाऊन: मुंबईहून मध्यप्रदेशकडे पायी निघालेल्या महिलेची नागपुरात प्रसूती...
रुग्णालयातील शवागृहात 14 ते 15 मृतदेह ठेवण्याची व्यवस्था शवागृहात आहे. ती क्षमता पूर्ण झाल्यावर मृतदेह शवागृहात ठेवता येऊ शकत नाहीत. मात्र, पालिका आयुक्तांनी कोरोनाचे मृतदेह शवागृहात वेगळे ठेवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत, असे महापौरांनी म्हटले आहे.