मुंबई - मुंबईतील आर्थर रोड येथील मध्यवर्ती कारागृहात राज्यातला पहिला कोरोना पोझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. खटला सुरू असलेल्या 50 वर्षीय कैद्यावर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अर्थर रोड कारागृहातील कैदी काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्याची कोविड चाचणी घेण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आढळल्याने त्यास जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आर्थर रोड येथील कारागृहात या कैद्याच्या संपर्कात आणखी किती जण आले आहे याची तपासणी सध्या सुरू करण्यात आली आहे.
1926 साली ब्रिटिशांनी बांधलेल्या या 94 वर्षे जुन्या कारागृहाची कैदी ठेवण्याची क्षमता आजच्या घडीला 1074 एवढी आहे. मात्र सद्यस्थितीत या कारागृहात 2000 हून अधिक कैदी ठेण्यात आल्याने कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाग्रस्त कैद्याला सामान्य बाराकीत ठेवले होते, असे तरुंग सूत्रांकडून कळत आहे.
तर दुसरीकडे, काही दिवसापूर्वी मुंबईतील जेजे मार्ग पोलीस ठाण्यातील 12 पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या तब्बल 48 जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. या संख्येत आणखीन भर पडत जेजे मार्ग पोलीस ठाण्यातील आणखीन 4 पोलिसांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण जेजे मार्ग पोलीस ठाणे क्वारंटाईनकरण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे.