मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मागील आठवडाभरापासून येथील आकडेवारी वाढते आहे. मंगळवारी दिवसभरात धारावीत २१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे ६० ते ७०च्या खाली घसरलेली अॅक्टीव रुग्णांची संख्या आता ११३ वर पोहचली आहे. त्यामुळे पालिका सतर्क झाली असून नियमांच्या कडक अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.
धारावी सहावेळा शून्यावर -
मागील वर्षीच्या मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर धारावीसारख्या दाटी-वाटीच्या झोपडपट्टीही कोरोनाची हॉटस्पॉट ठरली होती. १ एप्रिलला धारावीत पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. दाटी-वाटीने वसलेल्या धारावीला कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक होण्याचा धोका होता. रुग्णसंख्या वाढू लागल्याने एका वेळी धारावी ‘कोरोना हॉटस्पॉट' बनली होती. मात्र, पालिकेने संपूर्ण यंत्रणा राबवून विविध उपाययोजना सुरु केली. कोरोना रोखण्यासाठी ‘धारावी पॅटर्न' राबवण्यात आला. ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या ४ टी मॉडेल, धारावी पॅटर्न, मिशन झिरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे धारावीत कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाला यश आले. जुलै-ऑगस्टनंतर धारावीत रुग्णसंख्या घटत गेली. त्यानंतर दोनअंकी असलेली रोजची रुग्णसंख्या एकवर आली. अॅक्टिव रुग्णांची संख्याही घटली. २४ डिसेंबर २०२० मध्ये पहिल्यांदा, २२ जानेवारी २०२१ ला दुसर्यांदा, २६ जानेवारीला तिसर्यांदा, २७ जानेवारीला चौथ्यांदा तर ३१ जानेवारीला पाचव्यांदा आणि २ फेब्रुवारीला सहाव्यांदा धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.
कोरोना पुन्हा वाढला -
कोरोना धारावीतून हद्दपार होणार अशी स्थिती असताना मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यानंतर आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. २ फेब्रुवारीला मुंबईभरातील ३३४ वर घसरलेली रुग्णसंख्या आता दोन हजारावर गेली आहे. काही दिवसांपासून धारावीतही कोरोनाने डोकेवर काढले आहे. ८ मार्चला दिवसभरात १८ रुग्ण आढळल्यानंतर आजपर्यंत सलग रुग्णसंख्या वाढते आहे. मंगळवारी ही रुग्णसंख्या २१ वर पोहचली आहे. बाजूच्या दादरमध्येही दिवसभरात १८ तर माहिममध्ये २४ रुग्ण आढळले. त्यामुळे येथील रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. धारावीत आतापर्यंत रुग्णांची संख्या ४२७९ वर पोहचली आहे. यातील ३८५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ११३ अॅक्टीव रुग्ण आहेत.
दादरमध्ये २७५ सक्रिय रुग्ण -
दादरमध्ये आतापर्यंत ५२९३ रुग्ण आढळले. यातील ४९२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे येथे २०२ अॅक्टीव रुग्ण आहेत. माहिमध्ये आतापर्यंत रुग्णांची संख्या ५२१४ वर पोहचली आहे. यातील ४७८५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. येथे २७५ सक्रीय रुग्ण आहेत.
हेही वाचा- मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केल्यानंतर शरद पवारांनी बोलाविली राष्ट्रवादी मंत्र्यांची बैठक