मुंबई - शहर परिसरात मागील महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असताना मुंबईमधील रुग्ण दुपट्टीचा कालावधी झपाट्याने खाली घसरत आहे. ८ फेब्रुवारीला ५७४ वर गेलेला रुग्ण दुपटीचा कालावधी १६ मार्चला १४५ दिवसांवर आला आहे. गेल्या ३६ दिवसात रुग्ण दुप्पटीचा कालावधी ४२९ दिवसांनी घसरला आहे. रोजच्या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असून १३ मार्चला १७०८ असलेल्या रुग्णांची संख्या १७ मार्चला तब्बल २३७७ वर पोहचली आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागासमोर आव्हान उभे राहिले आहे.
४२९ दिवसांनी घसरला दुप्पट्टीचा कालावधी -
मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार होत आहे. वर्षभरात करण्यात आलेल्या प्रयत्नामुळे डिसेंबरपर्यंत कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. मुंबईत रुग्ण दुप्पटीचा कालावधी १ जानेवारीला ३६५ दिवस इतका होता. ३१ जानेवारीला तो ५५९ दिवसांवर तर ८ फेब्रुवारीला ५७४ दिवसांवर पोहचला होता. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्ण दुपटीचा कालावधीही कमी होत असल्याने चिंता वाढते आहे. कोरोना रोखण्यासाठी पालिकेने चाचण्यांचे प्रमाण - क्लोज कॉन्टॅक्टचा तत्काळ शोध, नियमांची कठोर अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. रोजच्या चाचण्या ३० ते ३५ हजारापर्यंत केल्या जात आहेत. तसेच रुग्णांमागे १५ क्लोज कॉन्टॅक क्वारंटाईन केले जात आहेत. कोरोना नियंत्रणात आल्याने राज्य सरकारने अनलॉकची प्रक्रिया टप्प्या- टप्प्याने सुरु करण्यात आली. सर्वसामान्यांसाठी लोकल, बाजारपेठा, हॉटेल, बार, रेस्टॅारन्ट, नाईटक्लब आदी सार्वजनिक ठिकाणांवरील निर्बंध शिथील केले. मात्र यावेळी मास्क वापरणे व सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळणे बंधनकारक होते. याकडे लोकांनी दुर्लक्ष केल्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
पालिकेकडून उपायोजना -
मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना महिनाभरापासून पुन्हा वाढू लागला आहे. रोजची रुग्णसंख्या २३०० हून अधिक वाढल्याने पालिका सतर्क झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण आढळणा-यांमध्ये ९० टक्क्यांवर रुग्ण हे इमारती आणि उच्चभ्रू वस्तीमधील असल्याचे पालिकेच्या पाहणीत समोर आले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, कार्यक्रम, नाईट क्लब आणि गर्दीची ठिकाणे तसेच कार्यक्रमांमधील गर्दीमुळेच रुग्णवाढ होत असल्याने पालिकेने अशा ठिकाणी कारवाईला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मिनी कंटेनमेंट संकल्पनेवर आधारीत उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये प्रतिबंधित क्षेत्रातील सोसायट्यांच्या पदाधिकार्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. क्वारंटाइनचे नियम मोडणार्यांची पालिकेकडे तक्रार करणे, स्क्रिनिंग, ऑक्सिजन पातळी मोजणे अशा उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. शिवाय शक्य त्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा देण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
असा घसरला रुग्ण दुपटीचा कालावधी -
३१ जानेवारी - ५५९ दिवसांवर
८ फेब्रुवारी - ५७४ दिवसांवर
१३ मार्च - १८६ दिवसांवर
१४ मार्च - १७६ दिवसांवर
१५ मार्च - १६५ दिवसांवर
१६ मार्च - १५६ दिवसांवर
१७ मार्च -- १४५ दिवसांवर
अशी वाढली रुग्णसंख्या -
१३ मार्च -- १७०८
१४ मार्च -- १९६२
१५ मार्च - १७१२
१६ मार्च -- १९२२
१७ मार्च -- २३७७