मुंबई - कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी लॉकडाऊनचा ५वा टप्पा लागू करण्यात आला असून, गेल्या २४ तासांत मुंबई पोलीस खात्यातील ३ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अंधेरी, जोगेश्वरी व निर्मल नगर पोलीस ठाण्यात हे कर्मचारी कार्यरत होते.
राज्यात पोलीस मृतांचा आकडा ४३ वर गेला आहे. राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांत अजूनही कोरोनाबधित १३९९ पोलिसांवर उपचार सुरू असून यात २०४ पोलीस अधिकारी तर १३९९ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोविड 19 च्या संदर्भात तब्बल १ लाख ३ हजार ३४२ कॉल पोलीस नियंत्रण कक्षावर आले असून अवैद्य वाहतुकीच्या १३३३ प्रकरणात २६८८७ जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत ८२३४४ वाहन जप्त करण्यात आली असून तब्बल ७ कोटी ६५ लाख १९ हजारांचा दंड पोलिसांनी ठोठावला आहे.
लॉकडाऊन काळात राज्यभरात कलम 188 नुसार तब्बल १ लाख ३० हजार ३९६ गुन्हे नोंदविण्यात आले असून मुंबई वगळता क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या ७३० जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. राज्यभरात या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या २६६ घटना घडल्या असून या प्रकरणी आतापर्यंत ८५१ जणांना अटक करण्यात आलेली आहे.
मुंबई पोलीस खात्यात सर्वाधिक मृत्यू
मुंबई पोलीस खात्यात लॉकडाऊनच्या काळात संक्रमित झालेल्या २९ पोलीस कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. २० मार्च ते १५ जून या दरम्यान मुंबई शहरात ७४८० प्रकरणात मुंबई पोलिसांनी १५४२७ आरोपींवर गुन्हे दाखल केले. पोलीस अजूनही २०३७ फरार आरोपींचा शोध घेत असून , तब्बल ४०५१ आरोपीना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. यामधील ९३३९ आरोपींना पोलिसांनी अटक करून जामिनावर सोडले आहे. मास्क न वापरणाऱ्या २३८८ जणांवर पोलिसांनी कारवाई आतापर्यंत केली आहे.