मुंबई - पुढील वर्षी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर वैधानिक समितीच्या निवडणुकासाठी सत्ताधारी शिवसेनेकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे. महापालिकेत मुंबईच्या विकासासाठी आम्ही सर्व पक्ष एक दिलाने काम करत आहोत. शिवसेनेला राष्ट्रवादी, काँग्रेस, समाजवादी सर्व पक्षांचा पाठींबा असून ही पालिकेतील महाविकास आघाडीची नांदी असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. दरम्यान भाजपामुळे लोक संभ्रमित झाले असून नियमांचे ते पालन करत नसल्याने कोरोना वाढत असल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला आहे.
एक दिलाने काम -
मुंबई महापालिकेच्या वैधानिक आणि विशेष समित्यांच्या निवडणुका दरवर्षी एप्रिल महिन्यात होतात. आज स्थायी समितीसाठी यशवंत जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना स्थायी समितीवर चौथ्यांदा संधी दिल्याबाबत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे यशवंत जाधव यांनी आभार मानले आहेत. कोरोनादरम्यान केलेल्या चांगल्या कामामुळेच आम्हा सर्वाना पुन्हा संधी देण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले. पालिकेत काम करताना आम्हाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी या सर्व पक्षांची साथ मिळत आहे. हे तिन्ही पक्ष जे योग्य ते योग्य आणि चूक ते चूक असल्याचे म्हणत असल्याने आम्ही एक दिलाने काम करत असल्याचे जाधव यांनी सांगितले.
भाजपामुळे कोरोना वाढला -
भाजपाने विरोधाला विरोध करण्याचे आणि चांगल्या कामाला विरोध करण्याचे काम सुरू केले आहे. कोरोना दरम्यान केलेल्या कामाला आणि लॉकडाऊनच्या निर्णयाला सिरोध करण्याचे काम भाजपाने केले आहे. भाजपाने जी भूमिका घेतली आहे त्यामुळेच कोरोना रुग्ण वाढत आहेत. लोक संभ्रमित होऊन कोरोना नियमांचे पालन करत नाहीत असा आरोप जाधव यांनी केला. कोरोना वाढत आहे तो थांबवण्यासाठी भाजपाकडून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले जात नाहीत. कोरोना रुग्ण कमी करण्यासाठी त्यांनी काही उपायोजना सांगितल्या असत्या तर आम्ही त्याचे स्वागत केले असते, मात्र भाजपा विरोधाचेच काम करत असल्याचे जाधव म्हणाले.
महाविकास आघाडीची सत्ता -
महापौर निवडणुकीपासून राष्ट्रवादीने शिवसेनेनला साथ दिली आहे. येणाऱ्या सर्व समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या सोबत राहणार आहे. पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाप्रमाणे राज्यात महाविकास आघाडी काम करत आहे. मुंबईतही मुंबईकरांना अपेक्षित काम करण्यासाठी समिती निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. भाजपा नेहमीच सोयीचे राजकारण करत आले आहे. मुंबईकर त्यांना साथ देणार नाही. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होईल असा मला विश्वास असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी म्हटले आहे.
ही नांदी नवीन नाही -
काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी हे मागील निवडणुकीपासून आणि प्रत्येक बैठकीत बघत आहोत. ही काही नवीन नांदी नाही. ही नंदी या पुढेही सुरूच राहील. यावरून खरा विरोधी पक्ष हा भाजपा असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षीही काँग्रेसने अर्ज भरला होता नंतर मागे घेतला आहे. भाजपाचा द्वेष करणे हा एकमेव कारण या पक्षांचा आहे. लोकांच्या मनात भाजपा आहे. पुढे कितीही संकटे आली तरी भाजपा त्यावर विजय मिळवून महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावेल, असे भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - लॉकडाऊन न लावण्याच्या मागणीसाठी काँग्रेस नेते संजय निरुपम यांचे हॉटेल व्यावसायिकांसह आंदोलन