मुंबई- हृदय, यकृत, किडनी, फुप्फुस, डोळे, स्वादुपिंड, आतडे अशा अनेक प्रकारच्या आतड्यांचे प्रत्यारोपण केले जाते. अनेक रुग्ण दात्यांच्या प्रतिक्षेत असतात. त्यानुसार दर महिन्याला मुंबईत बऱ्यापैकी अवयव प्रत्यारोपण केले जाते. मात्र गेल्या महिन्याभरापासून अवयव प्रत्यारोपण बंद आहे.
अवयव प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यास त्यांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे केवळ आणि केवळ तात्काळ अवयव प्रत्यारोपण करण्याची गरज आहे, त्याच शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. पण त्याही 2 वा 3 च्या घरातच आहेत. तर बाकी सर्व शस्त्रक्रिया बंद ठेवण्याचा निर्णय अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञांनी घेतला आहे.
गेल्या काही वर्षात अवयव दानाबाबत जनजागृती वाढली आहे. अनेक दाते पुढे येत आहेत. हे प्रमाण वाढत असले तरी अजूनही मोठ्या संख्येने दाते पुढे येण्याची गरज आहे. अशात कोरोना इफेक्ट म्हणून महिन्याभरापासून अवयव प्रत्यारोपण बंद आहे. मुंबईत दर महिन्याला किडनी अवयव प्रत्यारोपणाच्या 25 ते 30 शस्त्रक्रिया होतात. पण महिन्याभरापासून एक वा दोनच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्याची माहिती डॉ. प्रशांत राजपूत, किडनी प्रत्यारोपण शल्यचिकित्सक, ग्लोबल हॉस्पिटल यांनी दिली आहे. लिव्हिंग डोनर आणि ब्रेन डेड डोनर अशा माध्यमातून किडनी प्रत्यारोपण केले जाते. पण कॊरोनाची भीती लक्षात घेता हे दोन्ही दाते पुढे येत नाहीत. आम्ही ही खबरदारी म्हणून प्रत्यारोपण करत नसल्याचे डॉ श्रीरंग बिछु यांनी दिली आहे. तर किडनी रुग्ण डायलिसिसवर राहू शकतात. त्यामुळे सद्या प्रत्यारोपण बंद असले तरी त्याचा परिणाम होत नसल्याचे ही ते म्हणाले.
महिन्याला मुंबईत 15 ते 20 यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतात. पण या महिन्याभरात एकही शस्त्रक्रिया झाली नसल्याची माहिती डॉ. रवी मोहंका, वरिष्ठ शल्यचिकित्सक, ग्लोबल हॉस्पिटल यांनी दिली आहे. एखाद्याला रुग्णाला तात्काळ यकृत प्रत्यारोपण गरजेचे असेल तर त्यासाठी आम्ही तयार आहोत. दाता पुढे आला तर दाता आणि रुग्ण दोघांची कॊरोना चाचणी करत प्रत्यारोपण करण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले आहे. किडनी वा इतर काही अवयव प्रत्यारोपण हे लिव्हिंग डोनरच्या ही माध्यमातून होते. पण हृदय प्रत्यारोपण हे फक्त ब्रेन डेड डोनरच्याच माध्यमातून होते. तर असे डोनर दुर्मिळ असतात. त्यामुळे मुंबईत महिन्याला हृदय प्रत्यारोपणाच्या 2 वा 3 इतक्याच शस्त्रक्रिया होतात. पण गेल्या महिन्याभरात एकही शस्त्रक्रिया झालेली नाही. कॊरोनाच्या भितीने ब्रेन डेड रुग्णांचे नातेवाईकच पुढे येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि कोरोनाची भीती अशीच काही महिने राहिली तर नक्कीच ज्यांना तात्काळ हृदय प्रत्यारोपण आवश्यक आहे त्याना अडचणी येऊ शकतात अशी माहिती हरकिशन दास हॉस्पिटचे हृदय प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. अन्वय मुळे यांनी दिली आहे.