मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणी गेल्या 11 दिवसांपासून सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. 14 जूनला सुशांतसिंह याने त्याच्या बांद्रा स्थित घरी आत्महत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्यानंतर 15 जूनला सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती ही कूपर रुग्णालयात तब्बल 45 मिनिटे असल्याचे समोर आल्यानंतर यासंदर्भात राज्य मानवाधिकार आयोगाकडून कूपर रुग्णालयाचे डीन डॉक्टर पिनाकिन गुर्जर यांना नोटीस बजावण्यात आली होती.
या संदर्भात तोंडी उत्तर देताना कूपर रुग्णालयाचे डीन डॉक्टर पिनाकिन गुर्जर यांनी रिया चक्रवर्ती ही शवगृहात गेल्याचं रुग्णालयाच्या प्रशासनाला माहीत नसल्याचे म्हटले आहे.
रिया चक्रवर्ती हिने 15 जूनला कूपर रुग्णालयातील शवगृहात 45 मिनिटे घालवली होती. मात्र, यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाला कुठलीही माहिती नव्हती किंवा कुठलीही परवानगी रुग्णालयाकडून देण्यात आली नव्हती, असे कूपर रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कूपर रुग्णालयाचे डीन डॉक्टर पिनाकिन गुर्जर यांनी मुंबई पोलिसांनी रिया चक्रवर्तीला परवानगी दिली असल्याचा आरोप सुद्धा केलेला आहे. मात्र, राज्य मानवाधिकार आयोगाचे या उत्तरामुळे समाधान झाले नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. येत्या 7 सप्टेंबरपर्यंत कूपर रुग्णालयाचे डीन व संबंधित विभागाच्या एचओडी विभागाच्या प्रमुखांना लेखी स्वरूपात उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.