मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती इंद्राणी मुखर्जी ने स्वतःची मुलगी शीना बोरा हिची हत्या ( sheena bora case ) केल्याच्या आरोपात 2017 मध्ये पोलिसांनी तिला अटक केली होती. इंद्राणी मुखर्जी गेल्या अनेक वर्षांपासून भायखळा जेलमध्ये आहे. इंद्राणी मुखर्जी जेलमध्ये असताना देखील आपल्या विविध वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. तसेच हत्याकांडा संदर्भात विविध नवीन नवीन आरोप-प्रत्यारोप देखील पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत इंद्राणी कोणकोणत्या प्रकरणांमध्ये चर्चेत राहिलेली आहे याचा सविस्तर आढावा...
काय आहे प्रकरण - इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. तिचा पहिला पती हा सिद्धार्थ दास. त्रिपुरा येथील टी स्टोअर ओनर असलेला सिद्धार्थ दास हा तिचा पहिला पती होता. सिद्धार्थपासून इंद्राणीला झालेली मुलगी म्हणजे शीना बोरा. नंतर इंद्राणीने कोलकतामधील व्यापारी संजीव खन्ना याच्यासोबत दुसरे लग्न केले. इंद्राणीचे तिसरे लग्न झाले ते मीडिया टायकून पीटर मुखर्जींसोबत. या दोघांमध्ये 16 वर्षांचे अंतर होते. इंद्राणीसोबत तिची मुलगी शीना राहातो होती. इंद्राणीने यावेळी पतीसह सर्वांना शीना आपली बहिण असल्याचं सांगितले. अशातच पीटर मुखर्जीचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितले जाते. यामुळे इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली. शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती.
शीना बोरा हत्येचा खुलासा - 21 ऑगस्ट 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर खार पोलीस स्टेशनचे अधिकारी दिनेश कदम यांच्या टीमने इंद्राणी शिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. पोलीस चौकशीत श्यामने तो एप्रिल 2012 मध्ये एका मुलीची हत्या करण्यात सहभागी होता असा धक्कादायक खुलासा केला होता. श्यामने पोलिसांना सांगितलं, की 24 एप्रिल 2012 मध्ये शीनाचा गाडीत गळा आवळून खून करण्यात आला. शीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने तिची आई इंद्राणी मुखर्जीची मदत केली होती. रायगडमध्ये मृतदेह फेकण्यात आला. यात इंद्राणी मुखर्जीचा पूर्व पती संजीव खन्नाही शामिल होता. अशी माहिती राकेश मारिया पुस्तकात देणात आलेली आहे.
श्यामला शीनाचा मृतहेद कुठे टाकण्यात आला त्याठिकाणी घेऊन जाण्यास पोलिसांनी सांगितलं. शीनाचा मृतदेह रायगडमधील गागोदे गावाजवळ एका निर्मनुष्य ठिकाणी टाकण्यात आला होता. ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळून टाकण्यात आला होता. शीनाचा खून झाला त्यादिवशी संजीव खन्ना कोलकात्याहून मुंबईत आला होता. इंद्राणी आणि शीना मुंबईतील वांद्रेमध्ये भेटल्या. गाडीत इंद्राणी, शिना, ड्रायव्हर श्याम राय आणि संजीव खन्ना होते. ठरल्याप्रमाणे गाडी मुंबईतील आर.डी. नॅशनल कॉलेजच्या गल्लीमध्ये आली. गाडीतच शीनाची गळा आवळून हत्या करण्यात आली. मृतहेद लपवण्यासाठी आणलेल्या सूटकेसमध्ये भरण्यात आला. त्यानंतर गाडी इंद्राणी मुखर्जी यांच्या वरळीतील घराच्या गॅरेजमध्ये ठेवण्यात आली. आणि दुसऱ्या दिवशी रायगडमध्ये मृतदेह जाळून टाकण्यात आला. पोलिसांनी शीना बोराच्या मृतदेहाचे अवषेश रायगडमधून जप्त केले होते. हे अवयव तपासणीसाठी सर. जे.जे रुग्णालयात पाठवण्यात आले होते. एम्सच्या फॉरेन्सिक विभागानं तयार केलेल्या या अहवालानुसार 2015 साली तपासादरम्यान सापडलेला सापळा हा शीना बोराचाच असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.
इंद्राणी मुखर्जीचे शीना बोरा हत्याप्रकरणातील वादग्रस्त वक्तव्य
मुलगी शीना जीवंत असल्याचा इंद्राणीचा दावा - शीना बोरा जीवंत असल्याचा दावा केल्यामुळे, पाच महिन्यांपूर्वी या प्रकरणाला वेगळे वळण आले होते. तुरुंगात असलेल्या एका महिला कैद्याची काश्मीरमध्ये शीनाशी भेट झाली होती. असा खळबळजनक दावा इंद्राणीने केला होता. इंद्राणीने या प्रकरणात सीबीआय संचालकांना पत्र पाठवले होते. त्यांनी शीना बोरा हिचा तपास काश्मीरात करावा, असे अपीलही केले होते. या प्रकरणाचा तपास सीबीआय करीत आहे. शीना हिचा गळा दाबून हत्या केल्याचा आणि नंतर तिचा मृतदेह जमिनीत गाडल्याचा इंद्राणीवर आरोप आहे.
सीबीआय शीना बोरा प्रकरण बंद करण्याच्या होती प्रयत्नांत - शीना बोरा प्रकरणाचा तपास बंद करण्याचा निर्णय सीबीआयने घेतला होता. मुंबईच्या स्पेशल कोर्टात सीबीआयने सांगितले होते की, 2012 सालच्या या प्रकरणातील त्यांचा तपास पूर्ण झाला आहे. सीबीआयने या प्रकरणात तीन आरोपपत्र आणि दोन पुरवणी आरोपपत्र दाखल केली होती. यात इंद्राणी मुखर्जी, तिचा ड्रायव्हर श्याम राय, जुना पती संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी यांना आरोपी करण्यात आले होते.
राकेश मारिया यांनी नेमका काय दावा केला? शीना बोरा हत्याकांडाच्या तपासादरम्यान मुंबईचे तत्त्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. या बदलीवर राकेश मारिया यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यांनी ‘लेटी मी से इट आय नो’ या पुस्तकात त्यांनी शीना बोना हत्याकांड प्रकरणी तत्त्कालीन सहआयुक्त देवेन भारती यांनी आरोपींची माहिती दडवल्याचा दावा केला आहे.
देवेन भारती यांचा पलटवार - पुस्तकाला चांगली मार्केटिंग मिळावी, यासाठी राकेश मारिया प्रयत्न करत असतील. ते एक पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी एका चार्जशीटवर आणि मिळालेल्या डायरीवर विश्वास ठेवायला हवा. त्यांनी फक्त एका स्टोरीवर विश्वास ठेवायला नको होता. मी यावर जास्त बोलू इच्छित नाही कारण या प्रकरणावर कोर्टात खटला सुरु आहे. शीना बोरा प्रकरणी सर्व माहिती तत्कालीन अधिकाऱ्यांना होती असे स्पष्टीकरण देवेन भारती यांनी दिले होते.
राकेश मारिया यांचे कुटुंब हे बॉलिवूडशी संबंधित आहे. त्यामुळे स्क्रिप्ट रायटिंगचा त्यांच्यावर प्रभाव आहे. हे सगळे प्रकरण म्हणजे पुस्तकाची विक्री आणि येत्या काळात वेब सिरीज बनवण्यासाठी तयार केलेला कंटेंट आहे. पण एका पोलीस दलातील व्यक्ती म्हणून चार्जशीट आणि रेकॉर्डवर असलेल्या गोष्टींवर मी विश्वास ठेवतो. या प्रकरणात तपास करणाऱ्या संपूर्ण टीमला सगळ्या गोष्टी माहिती होत्या. कोणतीही गोष्टी लपवण्यात आलेली नाही. या संदर्भातले जे पेपर्स आहेत ते पडताळून पाहिल्यास सत्य आहे, ते समोर दिसेल असे देवेन भारती यांनी स्पष्ट केले होते.
इंद्राणी मुखर्जी वर तुरुंगात हिंसाचार प्रकरणात दाखल झाला होता गुन्हा - भायखळा तुरुंगातील हिंसाचार प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेल्या वर्षी आरोपपत्र दाखल केले होते. त्या आरोपपत्राची इस्प्लेनेड मॅजिस्ट्रेट कोर्टाने दखल घेतली आणि आरोपींना समन्स बजावले. याचदरम्यान इंद्राणी मुखर्जीला खटल्याला हजर राहण्याच्या अटीवर जामिनावर सोडण्यात आले. 2017 मध्ये मंजुळा शेट्येच्या मृत्यूनंतर इंद्राणी मुखर्जी व भायखळा महिला कारागृहातील 30 हून अधिक कैद्यांवर गुन्हेगारी कट, दंगल आणि धमकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंजुळा शेट्ये हिच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी करीत आणि कारागृह कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करत महिला कैद्यांनी आंदोलन केले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी आरोपपत्र दाखल केले होते. अतिरिक्त मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या कोर्टाने इंद्राणी मुखर्जीला या खटल्याशी संबंधित कोणालाही प्रलोभन, धमकी न देण्याच्या अटीसह 15,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. त्यावेळी या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा देखील झाली होती.
हेही वाचा - Indrani Mukherjee : कोण आहेत इंद्राणी मुखर्जी? ज्यांच्यावर शीना बोराच्या हत्येचा आहे आरोप