मुंबई - लॉकडाऊननंतर तब्बल 10 महिन्यानंतर लोकलसेवा मुंबईकरांसाठी खुली करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना हा मोठा दिलासा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
या वेळेत करता येईल प्रवास
मात्र सामान्यांसाठी निर्धारित वेळेत हा प्रवास करता येणार आहे. पहाटे पहिल्या लोकल पासून सकाळी सात वाजेपर्यंत सकाळच्या वेळेत हा प्रवास सर्वसामान्य प्रवाशांना करता येणार आहे. तसेच दुपारी 12 ते 4 या वेळेत प्रवास करता येइल. तर रात्री 9 नंतर शेवटच्या लोकल पर्यंत प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पूर्ण नसला तरी काही प्रमाणात या निर्णयाचा मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. टप्याटप्याने लोकल सेवा सुरू केली जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री यांनी आधीच दिले होते. अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी यांच्यासाठी लोकल सेवा सुरू होती. त्यानंतर महिलांसाठी निर्धारित वेळेत ही सेवा देण्यात आली. आणि आता सर्वसामान्य लोकांसाठी ही सुविधा दिल्याने पूर्ण नसला तरी काही प्रमाणात दिलासा नक्कीच मिळाला आहे.
रेल्वे कडून अजून दुजोरा नाही
मुख्यमंत्र्यांनी निर्धारित वेळेत सर्वसामान्य जनतेला लोकलसेवा करण्याचे निर्देश दिले असले तरी, रेल्वे बोर्डाकडून या संबंधी माहिती समोर आलेली नाही. याआधीही महिलांसाठी निर्धारित वेळेत लोकल सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यानंतर रेल्वे बोर्डाकडून लोकलसेवा देण्यात असमर्थता दाखवली होती. त्यामुळे आता रेल्वे बोर्ड नेमके काय निर्णय घेणार याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे. निर्णय घेण्याआधी राज्यसरकार आणि रेल्वेबोर्डाचे अधिकारी यांच्यात अनेक वेळा बैठका झाल्याची माहितीही देण्यात आली होती. तसेच लोकल सेवा सुरू व्हावी यासाठी काही सामाजिक संघटनांनीही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण अद्याप यावरही न्यायालयाचा निर्णय आलेला नाही.
सामान्यांसाठी लोकल दिवसभर खुली असावी - रेल यात्री परिषद
सर्वसामान्यांसाठी लोकल खुली करण्याच्या निर्णयाचे रेल यात्री परिषदेने स्वागत केले आहे. मात्र लोकल सामान्यांसाठी दिवसभर खुली असली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. बोरिवली, ठाणे व इतर लांबच्या परिसरातून येणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी त्यांच्या खासगी कार्यालयात पोहोचण्यासाठी ही वेळ योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सामान्यांना दिवसभर लोकलमध्ये प्रवास करू द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.