मुंबई - अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत 7 गाड्या एनआयएने ताब्यात घेतल्या आहेत. यात 2 मर्सिडीज, 1 इनोव्हा, 1 प्राडो, 1 व्होल्वो, 1 आउटलँडर आणि शेवटची स्कॉर्पिओ जी स्फोटकांनी भरलेली होती. मात्र, जप्त केलेल्या 8 गाडयांपैकी 4 गाड्यांचा थेट संबंध पोलीस आयुक्तालयाशी होता, असे एटीएसच्या तपासात उघडकीस आले होते. दरम्यान, आठवी गाडी एनआएने आज(31 मार्च) वसईतून ताब्यात घेतली आहे.
एटीएमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटकं प्रकरणात वापरण्यात आलेल्या इनोव्हाबद्दल एनआयएला माहिती एटीएसनेच दिली होती. त्यानुसार वाझेच्या अटकेनंतर एनआयएने इनोव्हा ताब्यात घेतली आणि मग या प्रकरणात एक एक गाड्या बाहेर येऊ लागल्या आहेत. त्याचा थेट संबंध पोलीस आयुक्तालयाशी येऊ लागला आहे.
स्फोटकं प्रकरण जेव्हा एटीएसकडे होते तेव्हा एटीएसच्या तपासात वाझेंची भूमिका संशयास्पद असल्याचे उघड झाले होते. तसेच स्कॉर्पिओ आणि इनोव्हा यांचा आयुक्तालयाशी असणारा संबंध याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यामुळेच एटीएसची एक टीम वाझेच्या सतत मार्गावर होती. तसेच पोलीस आयुक्तालयात असणाऱ्या इनोव्हावर लक्ष ठेवून होती. वाझेच्या लक्षात आल्यानंतर, माझा कोणीतरी पाठलाग करतंय असे वाझेकडून माध्यमांना सांगण्यात आले होते. मात्र ही गाडी एटीएसची असल्याचे वाझेला माहिती होते.
आठवी गाडी 'एनआयए'च्या ताब्यात
अँटिलिया प्रकरणी आठवी गाडी एनआएने वसईतून ताब्यात घेतली आहे. या गाडीचा तपास पहिल्या दिवसापासून सुरू होता. यामुळे आता महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - परमबीर सिंग याचिका सुनावणी : "तुम्ही तुमच्या कर्तव्यात कमी पडलात"; न्यायालयाची सिंगांवर बोचरी टीका
वाझे प्रकरणात वापरण्यात आलेल्या चार गाड्या
- 1) पहिली गाडी - स्फोटके असणाऱ्या स्कॉर्पिओसोबत फिरणारी इनोव्हा
एनआयएने पहिली गाडी ताब्यात घेतली ती म्हणजे इनोव्हा. ती गाडी सीआययु पथकाची होती आणि पोलीस आयुक्त कार्यालयात होती. घटनेच्या दिवशी स्फोटके भरलेल्या स्कॉर्पिओसोबत ती गाडी अँटिलिया परिसरात आली होती. याच गाडीतून वाझेने पांढरा कुर्ता घालून प्रवास केला होता.
- 2) दुसरी गाडी -
स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ 24 तारखेला अँटिलिया परिसरात पार्क करण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वी 4 दिवस ती पोलीस आयुक्त कार्यालयात उभी होती, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
- 3) तिसरी गाडी -
17 फेब्रुवारीला मनसुख आणि वाझे यांची भेट ज्या गाडीत झाली ती गाडी होती मर्सिडीज 4 मॅटिक. ही गाडी गाडी वाझे वापरत होता. वाझे ही गाडी नेहमी पोलीस आयुक्त कार्यालयात आणत होता. 17 फेब्रुवारीला मनसुख यांना भेटून स्कॉर्पिओची चावी घेतल्यानंतर वाझे ही गाडी घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात आला होता.
- 4) चौथी गाडी -
वाझे वापरत असलेली प्राडो गाडी एनआयएने ताब्यात घेतली आहे. ही तीच गाडी आहे ज्या गाडीतून मनसुख हिरेन आणि वाझे एकत्र पोलीस आयुक्त कार्यालयात आले होते. याच गाडीतून मनसुख हिरेन त्याचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी पहिल्यादा सचिन वाझेसोबत पोलीस आयुक्त कार्यालयात आले होते.
या चार गाड्यांबरोबरच अजून एक गाडी सीआययु पथकाशी जोडली असल्याचे एनआयएच्या तपासात उघड होताना दिसत आहे. कालच एनआयएने वाझेच्या नावावर असलेली आऊटलँडर गाडी नवी मुंबईतून ताब्यात घेतली आहे. वाझेसोबत काम करत होते त्या प्रकाश होवाळ यांनी ही गाडी वापरली असल्याचा संशय एनआयएला आहे. प्रकाश होवाळ यांची गेल्या काही दिवसांपासून एनआयएकडून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, एटीएसकडे तपास होता तेंव्हा एटीएसने पोलीस आयुक्तालयाचे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी तीन वेळा मुंबई पोलिसांशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी त्या पत्राला उत्तर दिले नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. या सगळ्या प्रकरणात एनआयएकडून सखोल चौकशी केली जात आहे. मात्र, ज्या मुंबई शहरात कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलीस काम करतात त्यांच्याच आयुक्तालयात गुन्ह्याचा कट शिजत होता तरी याचा सुगावा कुणालाच लागला नाही.
हेही वाचा - मनसुख हिरेनची हत्या झाली तेव्हा सचिन वाझे आणि विनायक शिंदे घटनास्थळी -एनआयए