मुंबई - राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचा ठपका ठेवत भाजपने महाराष्ट्र बचाव आंदोलन नुकतेच केले. त्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी राज्यात गुरूवारी, २८ मे रोजी केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून ऑनलाईन मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी सोशल मीडियातील फेसबूक, ट्वीटर, इन्स्टाग्राम, युट्युब आदी सर्वच माध्यमांचा वापर करून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला जाणार आहे.
गुरूवारी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत हे ऑनलाईन आंदोलन छेडले जाणार असून यात सुमारे ५० लाखांहून अधिक कार्यकर्ते सामील होण्याची शक्यता आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने केलेल्या चुकांचा पाढा यावेळी वाचला जाणार आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी यासाठी एक पत्र जारी करून काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशभरात लाखो स्थलांतरीत कामगार अडचणीत सापडले, अनेकांचे बळी गेले, तर दुसरीकडे असंख्य रोजगार गेले, त्यासाठी केंद्राने अद्यापही दिलासा मिळेल अशी कार्यवाही केली नाही. दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती भयंकर बनलेली असताना ज्या प्रमाणात मदत देण्याची गरज आहे, ती दिली जात नाही. तर उत्तर प्रदेश आदी राज्यांच्या सीमांवर स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी अडवणूक करून त्यांना वेठीस धरले जात ओह. त्यासाठीचा आवाज काँग्रेस आपल्या या ऑनलाईन आंदोलनाच्या मोहिमेतून उठवणार आहे.
केंद्र सरकारने तातडीने देशातील स्थलांतरित मजुरांच्या, कष्टकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करावी, आदी मागण्या यावेळी लावून धरल्या जाणार आहेत. काँग्रेसकडून कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात करण्यात येत असलेल्या या ऑनलाईन मोहिमेचा कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जाणार आहे.