मुंबई - कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राने राज्यात खळबळ उडाली आहे. या पत्रातील मजकूराने उद्योग आणि ऊर्जा विभागातील कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कॉंग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विभागाशी संबंधित मजकूर असल्याने कॉंग्रेसमध्ये बेबनाव असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे या पत्राचा ऊर्जा विभागाशी काहीही संबंध नसून खनिकर्म मंडळाच्या कारभाराच्या चौकशीची मागणी केली असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
कामांत त्रुटी, प्रक्रियेत घोळ
महाराष्ट्र राज्य खनिकर्म मर्यादित नागपूर विभागाने महाजनकोसाठी कोळसा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. कोळसा पुरवठा आणि कोळसा वाशिंगच्या निविदा प्रक्रियेत घोळ झाला असून गैरमार्गाचा वापर आणि अनधिकृतपणे पदाचा वापर करून कंपनीला काम दिल्याचा ठपका पटोले यांनी या पत्रातून ठेवला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना महाजनकोने दिलेल्या कामाच्या अंतिम आदेशाला स्थगिती द्यावी. निविदा प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी पटोले यांनी पत्रातून केली. हे पत्र प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होताच, आता राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
पटोले यांचे स्पष्टीकरण
कुठलेही पत्र उर्जा विभागाविरोधात दिलेले नाही. नागपूरच्या खनिकर्म विभागाने दोन वर्षाचे निविदा काढल्या होत्या. अनेक त्रुटी त्यात आहेत. मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिले होते. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी या पत्राचा काहीही संबंध नाही. कॉंग्रेसमध्ये अंतर्गत वाद कसे सुरु आहेत, हे दाखविण्याचा विरोधकांचा खटाटोप आहे, असे पटोले स्पष्ट केले आहे.
पटोले आणि राऊत वाद जुनाच
भाजपातून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले नाना पटोले आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांच्यात या आधीही वाद सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. मंत्रिमंडळ स्थापनेच्यावेळी नाना पटोले यांनी ऊर्जा खाते मिळावे, यासाठी हायकमांडकडे प्रयत्न केल्याचे म्हटले जाते. मात्र, कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाना पटोले यांना विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड केली. तर राऊत यांच्याकडे ऊर्जा खाते सोपवले. यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये कुरबुरी चर्चेचा विषय बनल्या होत्या. दरम्यान, नानांच्या पत्राबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
हेही वाचा - जिल्हा निर्मिती झाली! मात्र, हंडाभर पाण्यासाठीची पायपीट कधी थांबेल?