मुंबई - देशातले सार्वजनिक उपक्रम विकून देश चालवण्याचे काम मोदी सरकार करत आहे. देश विकून देश चालवण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. इंधनाचे दर कमी करून तसेच कर कमी करून सामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केंद्र सरकारने केले पाहिजे. महागाई कमी करून सर्वसामान्य जनतेला जगण्याचा दृष्टीकोण या बजेटमधून केंद्र सरकारने सामान्य नागरिकाला द्यावा, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. मात्र "लैलासाठी मजनुने जेवढा मार खाल्ला नसेल, तेवढा मार तरुण बेरोजगारीमुळे खात आहेत, असे मेसेज तरुण करू लागले आहेत. असा टोला पटोले यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
टिळक भवन येथे असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिल्यानंतर केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना हा टोला केंद्र सरकारला लगावला आहे. केंद्र सरकारकडून देण्यात आलेले दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही. शेतकऱ्यांना अद्यापही सबसिडी मिळालेली नाही, याबाबत अर्थसंकल्पामध्ये तरतूद असणार का? असा सवालही नाना पटोले यांनी यावेळी उपस्थित केला.
मॉलमध्ये वाईन विकण्याचे धोरण केंद्र सरकारचे -
शेतकऱ्यांच्या मालाचा भाव दामदुप्पट झाला पाहिजे. यासाठी मॉलमध्ये वाईन विकण्याचे धोरण केंद्र सरकारचे आहे. त्या धोरणानुसारच महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला. आज भारतीय जनता पक्ष या निर्णयाला विरोध करत असला तरी, देशी दारूच्या दुकानांबाबत लोकसंख्येची अट शिथील करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले होते. महाराष्ट्राच्या गावागावांमध्ये बिअर शॉपी उघडण्याचा मानस भाजप सरकारचा होता. डान्सबार बंद करण्याचे काम काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने केले होते. मात्र भाजप सरकारने डान्सबार देखील सुरू केले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला महाविकास आघाडी सरकारवर आरोप लावण्याचा कोणताही अधिकार नाही, असा घणाघात नाना पटोले यांनी यावेळी केला.
15 हजार कोटींचे डिल करून केंद्राने पेगासस खरेदी केले -
पेगासस सॉफ्टवेअर खरेदी करून केंद्र सरकारने पत्रकार, न्यायधीश, प्रशासकीय व्यवस्थचे बडे अधिकारी आणि राजकीय लोकांचे फोन टॅप केले. यासाठी त्यांनी पंधरा हजार कोटी रुपये खर्च करुन पेगासस सॉफ्टवेअर खरेदी केले. या सॉफ्टवेअरच्या आधारावर या सर्व लोकांचा खाजगी आयुष्यात डोकावून लोकशाहीचा खून करण्याचा काम केंद्राच्या सरकारने केल आहे. लोकशाहीच्या आधारावर ज्या जनतेने केंद्र सरकारला निवडून दिले त्याचे जनतेवर नांगर ठेवण्याचे पाप भारतीय जनता पक्षाचे सरकार करत असल्याची खरमरीत टीका नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर केली.