मुंबई - चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरच्या पार्टीच्या एका व्हिडिओवरून एनसीबीने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. हा व्हिडिओ २०१९ साली व्हायरल झाला. त्यावेळी फडणवीस सरकार होते त्यावेळीच या पार्टीची चौकशी करावी ,असे फडणवीस सरकार किंवा एनसीबीला वाटले नाही का, असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे. पार्टीच्या व्हिडिओवरून करणला चौकशीस बोलणारी एनसीबी कंगना राणौतला चौकशीसाठी बोलवण्यास का घाबरते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ड्रग्ज संदर्भात तिचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याबद्दल एनसीबीला एवढी आपुलकी का व कशासाठी, असे सावंत म्हणाले.
राष्ट्रीय तपास यंत्रणा या भारतीय जनता पार्टी सरकारच्या हातच्या बाहुल्या झाल्या आहेत. पक्षाच्या इशाऱ्यावर त्या नाचत असल्याचं वारंवार स्पष्ट होत आहे. एनसीबी, ईडी, सीबीआय, आयकर विभाग या राष्ट्रीय तपास यंत्रणा सिलेक्टिव्ह चौकशी करताना दिसतात. एका पार्टीच्या व्हिडिओवरून करण जोहरची चौकशी होऊ शकते, तर कंगनाच्या चौकशीची हिम्मत एनसीबी का दाखवत नाही. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात एनसीबीचा काय स्वार्थ असावा, असे प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केले. करण जोहरच्या पार्टीचा व्हिडिओ २०१९ चा आहे. त्यावेळी गृहमंत्री फडणवीस होते, त्यांनी यावर खुलासा करावा, असे सावंत म्हणाले.
..हे तर फिल्मसिटी उत्तर प्रदेशला घेऊन जाण्याचे षडयंत्र
एनसीबीला ईडीतर्फे सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग अँगल शोधण्यासाठी बोलवण्यात आले होते. अभिनेता सुशांतसिंह प्रकरणातील ड्रग अँगलची चौकशी करण्यात एनसीबी सपशेल फेल गेली आहे. आता ‘जाना था जापान पहुंच गये चीन’ अशी एनसीबीची अवस्था आहे. सीबीआयसुद्धा सुशांतसिंह प्रकरणात काहीच निष्पन्न करू शकली नाही. आज सीबीआय चिडीचूप बसली आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येचा वापर भाजपाने आपल्या गलिच्छ राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणांचा वापर करून घेतला. आजही तेच होत आहे. ड्रग्ज चौकशीच्या नावाखाली बॉलिवूडला, महाराष्ट्राला, मुंबई पोलीसांना बदनाम करण्याची पद्धतशीर मोहिम राबविली जात असून उत्तर प्रदेशमध्ये बॉलिवूड घेऊन जाण्याच्या मोहिमेचा हा एक भाग आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी फिल्मसीटी उभी करण्याची घोषणा केल्यानंतर अशा कारवाया करून बॉलिवूडवर दबाव टाकण्याचे प्रकार होत आहेत, असंही सावंत म्हणाले.
एके ठिकाणी मुंबई पोलिसांच्या नार्कोटीक्स गुन्हे शाखेतर्फे किलो किलोने ड्रग्ज साठे पकडले जात असताना, एनसीबीच्या हाती ग्रॅमभर ड्रग्जही लागत नाही, हे वास्तव आहे, असे सावंत म्हणाले.
ड्रग्ज सिंडिकेट प्रकरण
सध्या राज्यभरात बॉलिवूड क्षेत्रातील कलाकारांच्या घरांवर एनसीबीकडून छापेमारी करण्यात येत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात ड्रग्ज सिंडिकेट समोर आले होते. यानंतर नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने आक्रमक होत बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शची मूळं उकरण्यास सुरुवात केली. यामध्ये अर्जून रामपाल, तसेच करण जोहर यांची नावं पुढे आली आहेत.