मुंबई - आपण देत असलेला निधी योग्य ठिकाणी पोहोचणार आहे. याची सामान्य माणसाला खात्री आहे. त्यामुळेच सामान्य माणसांकडूनही राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. मतांसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधींचे अस्थिकलश गावोगावी फिरवणाऱ्या काँग्रेसने राममंदिराच्या निधीची उठाठेव करू नये, असा टोला भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका पत्रकाद्वारे लगावला आहे.
काँग्रेसी मंडळींचा पोटशूळ झाला-
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राममंदिर निधी संकलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर शंका घेत. हा निधी योग्य ठिकाणीच जाईल याची राज्य सरकारने काळजी घ्यावी, असे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकात उपाध्ये म्हणाले, राममंदिरासाठी सामान्य माणूसही स्वतःहून निधी देऊ लागल्याने काँग्रेसी मंडळींचा पोटशूळ झाला आहे. त्यामुळेच निधी योग्य ठिकाणी जातोय की नाही याची चिंता काँग्रेसवाल्यांना वाटू लागली आहे. राममंदिरासाठी होत असलेले निधी संकलन पूर्णतः पारदर्शक पद्धतीने होत आहे. निधी संकलन करणारे कार्यकर्ते त्याची पावती त्वरीत निधी देणाऱ्याकडे सुपूर्त करीत आहेत. निधी संकलन करणाऱ्या संघटनांवर विश्वास असल्यानेच गोरगरिबही निधी संकलनास हातभार लावत आहेत.
काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी जामिनावर-
ज्या काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी जामिनावर आहे, अशा पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्यांना सगळीकडे गैरव्यवहारच दिसत असणार. राममंदिराचा निधी नॅशनल हेराल्ड प्रमाणे अन्यत्र वळविला जाणार नाही. याची सामान्य माणसाला खात्री आहे, असेही उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा- अण्णा हजारेंचे उपोषण मागे; देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई