मुंबई - पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात मुंबईत काँग्रेसचे भाजप सरकार विरोधात आंदोलन सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधातही काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. अर्थमंत्री आज मुंबईत येणार आहेत. त्यामुळे तर कार्यकर्ते आणखीनच आक्रमक झाले आहेत.
दादर परिसरात काँग्रेसचे आंदोलन -
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, मंत्री वर्षा गायकवाड, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्ते दादर स्टेशन परिसरात निषेध करत आहेत. आज (रविवार) मुंबईच्या दादर येथील भाजपच्या कार्यालयात अर्थमंत्री निर्मला सीतारामन येणार असल्याने त्यांच्यासमोर काँग्रेस नेते निदर्शन करणार आहेत. अर्थमंत्री सीतारामन यांचे बॅनर हातात घेवून अर्थसंकल्पाचा कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात येत आहे. या निदर्शनात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्याअसून काही दादर भागात वाहतूक कोंडी झाली आहे.
'मोदींनी फक्त मन की बात केली, जन की बात केलीच नाही'
आम्ही देशांच्या अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारणार आहोत. २ कोटी रोजगार तुम्ही देणार होता, त्याचं काय झालं. आज तरुण रस्त्यावर आला आहे. ३९२ रुपयांचे सिलेंडर ७१९ रुपये कसे झाले? तुळ डाळीसह खाण्यापिण्याचे सर्व पदार्थ महाग झाले आहेत. गरीबांचा आवाज काँग्रेसने कायमच वाढवला आहे. ज्या देशाच्या पंतप्रधानांनी सहा वर्षात फक्त मन की बात केली. जन की बात केली नाही. महागाई आणि गरीबापासून गरीबाची सुटका करा. बेकारांच्या गरीबांच्या हाताला काम द्या. स्वयंपाक घरातील गृहीणीला आधार द्या, असे भाई जगताप म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपाच्या जाहीरातबाजीवरही जोरदार टीका केली.
'निर्मला सीतारामन माघारी जा' - कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच रोज इंधनाचे दर वाढत आहेत, आणि घरगुती गॅसच्या दरातही मोठी वाढ झाली असल्याने मोदी सरकार करतेय काय? अशा घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध काँग्रेकडून केला जातोय. नरेंद्र मोदी हाय हाय, निर्मला सीतारामन माघारी जा अशा घोषणा काँग्रेस कार्यर्त्यांकडून देण्यात येत आहेत.