मुंबई - काँग्रेसचा 137 वा स्थापना दिवस साजरा करण्यासाठी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात (Shivaji Park) काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi Rally Postpones) यांचा मेळावा घेण्यात येणार होता. मात्र, राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा (Omicron in State) वाढता प्रादुर्भाव पाहता राहुल गांधी यांचा हा मेळावा पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी दिली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन भाई जगताप यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
- म्हणून याचिका मागे घेतली -
राहुल गांधी यांच्या मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी भाई जगताप यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, चोवीस तास उलटण्या आधीच ही याचिका त्यांनी मागे घेतली. 20 डिसेंबरपासून न्यायालयाला ख्रिसमसच्या सुट्ट्या सुरू होत आहेत. त्यामुळे या याचिकेवर सुनावणी होणे कठीण असल्यामुळे याचिका मागे घेण्यात आली असल्याचे कारण भाई जगताप यांच्याकडून देण्यात आले. तसेच राहुल गांधी यांच्या मेळाव्याला राज्य सरकारने देखील परवानगी दिली नसली तरी परवानगी नाकारली नव्हती. मात्र, ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव पाहता मेळावा न घेण्याबाबत निर्णय काँग्रेसकडून घेण्यात आला असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.
- तेजपाल हॉलमध्ये साजरा केला जाणार काँग्रेस स्थापना दिवस -
मुंबईच्या ऐतिहासिक अशा तेजपाल हॉलमध्ये काँग्रेसचा 137 वा स्थापना दिवस कोविडचे सर्व नियम पाळून साजरा केला जाणार असल्याची माहिती भाई जगताप यांनी दिली. तसेच या कार्यक्रमाला राहुल गांधी यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही भाई जगताप यांनी सांगितले.
- राहुल गांधींचा मेळावा शिवाजी पार्कमध्येच होणार-
ओमायक्रोनचा वाढता प्रादुर्भाव पाहता 28 डिसेंबरचा राहुल गांधी यांचा मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र, शिवाजी पार्क मैदानावरच राहुल गांधी यांचा महानगरपालिका निवडणूक आधी मेळावा घेण्यात येईल. त्याची तारीख लवकरच जाहीर करू, असे संकेत भाई जगताप यांनी दिले.