मुंबई - शहर आणि परिसरात सकाळपासून धो-धो कोसळणार्या पावसामुळे मुंबई प्रदेश काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेले जेईई आणि नीट या परीक्षा विरोधातील आंदोलन लवकर आटोपले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान शेजारी असलेल्या राजीव गांधी भवन ते आझाद मैदान परिसरापर्यंत हे आंदोलन करण्यात येणार होते. परंतु, पावसामुळे ते लवकरच आटोपण्यात आले.
केंद्र सरकार जेईई आणि नीट या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात मुंबई प्रदेशाध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्यासह मुंबई प्रदेशचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आदी नेत्यांनी सहभाग नोंदवला होता.
देशात सध्या कोरोनाने थैैैमान घातले असताना केंद्र सरकार मात्र जीईई आणि नीट या परीक्षेच्या संदर्भात आपली आडमुठी भूमिका घेत आहे. भारतात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३३ लाखाच्या वर गेली असताना आणि हा आकडा सतत वाढत असताना जेईई आणि नीटच्या परीक्षा घेण्याचा केंद्र सरकारचा हट्ट हा विद्यार्थी विरोधी व जनता विरोधी असल्याची प्रतिक्रिया यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. तर आज देशात कोरोना या महामारीमुळे इतकी भयावह परिस्थिती निर्माण झाली असताना सुद्धा लाखो विद्यार्थ्यांचा जीव संकटात टाकणे हे नैतिकतेला धरून नसल्याचे मुंबई प्रदेशाध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.
जेईई आणि नीट या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात या मागणीसाठी आज मुंबईसह काँग्रेसकडून राज्यभरात निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या आडमुठ्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.