मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना, राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी वांद्रे येथील लसीकरणावरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली. यावेळी 'शिवसेनेने स्वतंत्र फंडातून लसी घेतल्या आहेत का,' असा संतप्त सवाल केला. तसेच लसींपेक्षा शिवसेनेचेच बॅनर जास्त, असा खोचक टोला त्यांनी ट्वीटद्वारे लगावला आहे. यापूर्वीही सिद्दीकी यांनी शिवसेनेला फटकारले होते. त्यामुळे मातोश्रीच्या अंगणात शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये शाब्दिक युध्द जुंपण्याची शक्यता आहे.
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संक्रमण वाढत आहे. कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून ठिकठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केली जात आहेत. घटक पक्षांमध्ये यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. वांद्रे येथे लसीकरण केंद्राचे अनावरण करण्यात आले आहे. कॉंग्रेसचे स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांनी गुरुवारी शिवसेनेवर थेट आरोप केले. 'शिवसेनेकडून वांद्रे पूर्व येथे आयोजित भव्य लसीकरण महोत्सवात तुमचं स्वागत, असे बॅनर लागले आहेत. याठिकाणी लसींपेक्षाही बॅनर्स जास्त दिसून येते. येथील बॅनरवर महाविकास आघाडीचा उल्लेख कुठेच दिसत नाही. म्हणजे, येथील लसी शिवसेनेना कार्यकर्त्यांच्या स्वखर्चातून आणल्या जात आहेत का? कृपया लसीकरण केद्रांच्या उद्घाटनाचा सोहळा करणे थांबवा. हे आपले कर्तव्यच आहे,' असे म्हणत सिद्दीकी यांनी शिवसेनेवर चौफेर टीका केली आहे. तसेच वांद्रे येथील लसीकरण केंद्रावरील पोस्टर्स आणि बॅनर्सचे फोटोही सिद्दीकी यांनी ट्वीटवरुन शेअर केले आहेत.
अनिल परब यांच्यावरही व्यक्त केली नाराजी
यापूर्वीही झिशान यांनी ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. आता 'महाराष्ट्रात कलम १४४ लागू आहे. पण शिवसेना नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनासाठी गर्दी करु शकतात. नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी आहेत का? शिवसेनेला हे नियम लागू नाहीत का?, इथे एक व्यक्ती लस घेत असताना बारा जण फोटो काढतात,' असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. तसेच मंत्री अनिल परब यांच्यावरही नाराजी व्यक्त केली होती. 'वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याकडून लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. मी स्थानिक आमदार असून सुद्धा प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही. मला या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. आपण लसीकरणाच्या मुद्द्यावर राजकारण करणार आहात का?,' असा थेट सवाल त्यांनी केला होता.