मुंबई - पेट्रोल डिझेल दरवाढी वरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्याचा प्रत्यय आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सर्व मंत्री आणि आमदारांनी सायकलवरून विधानभवन गाठत पेट्रेल डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवला. यावेळी केंद्र सरकार विरोधात विधानसभवनात घोषणाबाजीही करण्यात आली.
विधानभवन परिसरात सायकलने प्रवेश -
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी असताना देशात मात्र इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर वाढल्याचा आरोप कॉंग्रेसतर्फे करण्यात आला आहे. याचा निषेध म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह मंत्री व सर्व आमदारांनी विधान भवन परिसरात सायकलवरून प्रवेश केला. तत्पूर्वी सर्वांनी मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादनही केले.
आजपासून सुरू होणार अधिवेशन -
दरम्यान, राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला असला तरी विरोधकांच्या हाती इतरही मुद्यांचे कोलित असणार आहेत. सत्ताधाऱ्यांच्या चिंतेत यामुळे भर पडली आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांसाठी मुख्यमंत्र्यांकडून चहापान आयोजित केला जातो. मात्र, या अधिवेशनाच्या तोंडावरच कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने चहापानाचे आयोजन रद्द करण्यात आले. महाविकास आघाडीचे हे दुसरे अर्थसंकल्पीय अधिवेशनही कोविडच्या संक्रमणात होत आहे. 8 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे मांडणार आहेत.
हेही वाचा - पंतप्रधान पदावरून हटवून दाखवाच; ओलींचे प्रचंड यांना खुले आव्हान