मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आलेला आहे. महाविकास आघाडी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची झोप उडालेली आहे. तर दुसरीकडे भाजपा सुद्धा या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अशातच कालच अटीतटीच्या झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी, एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) हे सच्चे व कट्टर शिवसैनिक असून मुख्यमंत्री यातून मार्ग काढतील, असा आशावाद भाई जगताप ( Bhai Jagtap ) यांनी दर्शवला आहे. मुंबईत बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी ते बोलत होते.
काँग्रेस आमदारांची बैठक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवासस्थानी महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर सायंकाळी महसूल मंत्री व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी काँग्रेस आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीला काँग्रेसच्या सर्वच्या सर्व ४४ आमदार, मंत्र्यांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे. काँग्रेसचे काही आमदार सकाळपासून नॉट रिचेबल झालेले आहेत, अशा बातम्या येत होत्या. यावर काँग्रेस पक्षाकडून स्पष्टीकरण देताना, असे काही नसून प्रत्येक आमदार, मंत्री संपर्कात आहे, असे सांगण्यात आल आहे. ही बैठक महाराष्ट्राचे प्रभारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.